सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावले आहे. त्यांना उद्या ( बुधवार २० जुलै ) सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे.
यापूर्वी २८ जून रोजी संजय राऊत यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आले होते. तसेच एप्रिलमध्ये, ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि दोन सहकार्यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता.