कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे, अशी भीती याआधी वेळोवेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग दर कमी झाला असला तरी पालकांमध्ये विषाणूचे भय कमी झालेले नाही. ग्रामीण भागात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बऱ्याच शाळांची घंटा अजून वाजलेलीच नाही. नागपूरच्या ग्रामीण भागात ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागांतील पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी सतावत असल्यामुळे जिल्ह्यातील 1250 शाळांपैकी अवघ्या 141 शाळा सध्या सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कोरोनाचे भय इथले संपत नाही’ असे चित्र सध्या नागपूरच्या ग्रामीण भागात आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करीत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. पुरेशी खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकू आणि संसर्गाचा धोकाही टाळू शकतो, अशी जनजागृती करून जिल्हा परिषदेमार्फत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोना विषाणूविषयी पालकांच्या मनात भीती कायम असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 1100 पेक्षा अधिक शाळा अजून सुरु झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे अनेक सरपंचांनीही शाळा सुरु करण्यासाठी आपली एनओसी दिली नसल्याची माहिती प्रकाशझोतात आली आहे.
राज्यात शिक्षण विभागाच्या आदेशाने कोरोनामुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पण नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या आठवी ते बारावीच्या 1250 पैकी आतापर्यंत केवळ 141 शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु झाल्या नाहीत. नव्या नियमावलीनुसार गावातील सरपंचांनी एनओसी अर्थात त्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्याशिवाय शाळा सुरु करण्यास परवानगी दिली जात नाही.