आज दि.२० जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

काँग्रेसचं अस्तित्व संपत
आलं : नरेंद्र मोदी

भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी पक्षातील खासदारांना निर्देश देताना काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं तरी आमचीच चिंता असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांना वारंवार सत्य सांगा असा आग्रह यावेळी मोदींनी केला.

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करणार
नाही; केंद्राची संसदेत माहिती

२०२१ च्या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीव्यतिरिक्त जातीनिहाय व्यक्तींची गणना करण्याची कोणतीही योजना नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने पुन्हा मांडली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले की, धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने असेही निदर्शनास आणून दिले की काही राज्यांनी जनगणनेत जातीय आकडेवारी गोळा करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले,
पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पुढील पाच दिवस राज्यात
सर्वत्र पावसाची शक्यता

पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत जोरदार ते मुसळधारेचा अंदाज. मुंबई-ठाण्यात २१ जुलैला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी २१, २२ जुलैला अतिमुसळधारेचा इशारा दिला आहे, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्रात हलका, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता.

‘मन की बात’ ने केले
आकाशवाणीला मालामाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाने २०१४ मध्ये प्रक्षेपण झाल्यापासून ३०.८० कोटी रुपयांची कमाई केली असून २०१७-१८ मध्ये १०.६४ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती राज्यसभेत सोमवारी देण्यात आली. ‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांद्वारे प्रसारित केला जातो.

पेगॅसस हे भारताला बदनाम
करण्याचं षडयंत्र : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पेगॅसससंदर्भातले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे केंद्रातील विरोधी पक्षांनी ठरवून केल्याचा प्रतिआरोप केला आहे. अधिवेशन डिरेल करण्यासाठी रणनीती करून, कपोलकल्पित बातम्या पेरून कामकाजात अडथळे आणले जात आहेत. काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी दिली आहे. पण या बातमीला कोणताही आधार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की आपली कोणतीही एजन्सी अशा प्रकारचं बेकायदा कृत्य करत नाही. एनएसओ या पेगॅसस तयार करणाऱ्या कंपनीने देखील अशा प्रकारच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये
राज कुंद्रा याला अटक

सोमवारी रात्री मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली आहे. या प्रकरणावरून काल रात्रीपासून चित्रपट क्षेत्रासोबतच मुंबईच्या बी टाऊनमध्ये मोठी खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अटक केल्यानंतर संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याची मोडस ऑपरेंड मुंबई क्राईम ब्रांचनं खुलासा करून सांगितली आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात पाच
किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण

कोणत्याही भक्तासाठी श्रद्धा असण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरीही. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात एका भक्ताने पाच किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण केली. या तलवारीची सध्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये सांगितली जात आहे. ही तलवार तिरुमालाच्या तिरुपती बालाजी मंदिरात एका दाम्पत्याने दिली आहे. रविवारी तिरुमाला येथील कलेक्टीव्ह गेस्ट हाऊसमध्येही माध्यमांसमोर सुमारे पाच किलो वजनाची तलवार देत असल्याचे सांगितले होते

काबुलमध्ये बकरी ईदच्या
प्रार्थनेवेळी रॉकेट हल्ला

अफगाणिस्तानातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये बकरी ईदच्या प्रार्थनेवेळी रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकले नाही. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाजवळ हा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. परकीय सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबान अफगाणिस्तानातील प्रमुख शहरे ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. काबूलच्या पारवान भागातून तीन क्षेपणास्त्रं टाकण्यात आली. ती बाग-ए अली मर्दन, चमन-ए-हुजुरी भागात पडली.

तर भविष्यात आरोग्य केंद्रांसाठी
डॉक्टर्स मिळणे अशक्य

मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. राजन यांनी नुकताच तमिळनाडू सरकारला NEET परीक्षेसंदर्भात एक अहवाल दिला आहे. NEET परीक्षा सुरु राहिली तर भविष्यात तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स देखील मिळणार नाहीत, अशी चिंता राजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भूमिका मांडली आहे.

बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी यांची
हंगामी क्रिकेट संघात निवड

बंगालचे क्रीडामंत्री आणि क्रिकेटपटू मनोज तिवारी यांचा आगामी क्रिकेट हंगामातील बंगालच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने आगामी मोसमातील संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडामंत्री असलेल्या मनोज तिवारी यांचादेखील समावेश आहे

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.