तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण आज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं”, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.
“आबासाहेबांनी डोंगराएवढा आदर्श उभारला आहे. जो पुरोगामी विचारसरणीचा वारसा त्यांनी जपला तो इथून पुढे असाच जपण्याचा आमचा पूर्ण कुटुंबियांचा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल, या दु:खाला सामोरं जाण्याची शक्ती इश्वराने सर्वांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो”, असं अनिकेत देशमुख बोलताना म्हणाले.
गणपतराव यांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेले चार दिवस मी सोलापुरातच होतो. आज सकाळी आलो. त्यांची तब्येत सुधारत होतो. पण आता घरी पोहोचल्यावर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला फोन केला. मी पुन्हा सांगोल्याकडे निघालो आहे. आबासाहेब यांच्या निधनाने विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आबासाहेब म्हणजे विधीमंडळातलं विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ही ऐकताना आम्हाला एकदम भारावून जायचं. गणपतराव यांनी आम्हाला घडवलं. ग्रामीण भागात काम करताना कष्टकरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करुन त्यांच्यासोबत कसं काम करावं ही शिकवण आबासाहेबांनी आम्हाला दिली. म्हणून त्यांची पोकळी आमच्यासाठी कधीही भरुन न निघणारी आहे. मला आता बोलायला सुद्धा शब्द कमी पडत आहेत. गेले तीन दिवस मी त्यांच्याजवळ रुग्णालयातच होतो”, असं जयंत पाटील म्हणाले.
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले. (फोटो क्रेडिट गुगल)