ईशान्येतील मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे २७ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये प्राबल्य असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी येथे प्रचारासाठी उतरल्या आहेत. दरम्यान, त्यांनी येथील जनतेला संबोधित करताना मोठे विधान केले आहे. ईशान्येतील जनतेने आम्हाला मत केल्दियास २०२४ साली नरेंद्र मोदींचा नक्कीच पराभव होईल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
मेघालयमधील राजबाला येथे ममता बॅनर्जी एका जाहीर सभेला संबोधित करत होत्या. येथे मुकूल संगामा हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत टीका केली. “या राज्यातील सीमाभागात रोजच गोळीबार होतो. मात्र आतापर्यंत किती केंद्रीय पथकं इथे पाठवण्यात आली. कालच बीएसएफच्या एका महिला जवानावर अत्याचार झाला, असे मी ऐकले आहे. आम्ही प्रत्येक धर्मावर प्रेम करतो. मी मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच धार्मिक स्थळांमध्ये जाते. सर्वांसोबत एकत्रितपणे राहणे हाच सर्वांत मोठा धर्म आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक सन साजरा करतो,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.