लता सोनावणे यांची आमदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

चोपडा मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी शिंदे गटाला जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेच्या चार आमदारांची रसद मिळाली. त्यापैकी चोपडय़ाच्या आमदार लताबाई सोनवणे या एक. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.पराभूत राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी आणि अर्जुनसिंग वसावे यांनी लताबाईंचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते. 

लताबाई या टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू शकलेल्या नसल्याने त्यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा अवैध असल्याचा निर्णय नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीतर्फे देण्यात आला होता. आमदार लताबाई यांनी सादर केलेले आणि अमळनेर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध उचित कारवाई करण्यात यावी,केलेली कारवाई कार्यालयाला अवगत करावी, असे आदेश समितीतर्फे देण्यात आले होते. समितीच्या या निर्णयाविरुद्ध लताबाई यांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले होते. खंडपीठाने जात पडताळणी समिताचा निकाल कायम ठेवल्याने लताबाई या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.