महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिवा येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. राहत असलेल्या इमारतीत बिल्डर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून हल्ला केल्याचा आरोप पालव यांनी केला आहे. विशेष म्हणजे बिल्डर मनमानी आणि गुंडा गर्दी करत आहे.
या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात पालव यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवरती मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आगोदर सुध्दा दोन कुटुंबात अनेकदा वाद झाले आहेत. परस्पर बिल्डर पत्रव्यवहार करीत असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.
विजया पालव यांच्यावर दिवा येथे आपल्या राहत असलेल्या इमारातीच्या बिल्डर कुटुंबीयांनी मारहाण केली. मारहाणीत विजया पालव यांना दुखापत झाली असून त्यांना ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर विजया यांना घरी सोडण्यात आले आहे. विजया पालव यांनी आपल्या घरी प्लंबरला घरातील काम करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी बिल्डरने प्लंबरला हटकले आणि विजया पालव यांना बोलावून घेण्यास सांगितले. बाहेरील व्यावसायिकांना कुठलेही काम देऊ नये असा दम देण्यास सुरुवात केली. विजया पालव यांनी बिल्डरच्या मनमानीला विरोध केल्यानंतर बिल्डर चेतन पाटील यांने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विजया यांच्या कानाखाली मारल्या असल्याचा आरोपा पालव यांनी केला आहे. तसेच त्यानंतर बिल्डर चेतन पाटील आणी त्याची आई, बायको, भाऊ आणि इतर सहकाऱ्यांनी विजया यांना जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे.
या आगोदर सुध्दा विजया पालव यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुध्दा बिल्डर आणि त्यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले होते. बिल्डरला त्यावेळी देखील सोसायटी मधील काही जणांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यानंतर देखील बिल्डरची मनमानी आणि गुंडा गर्दी सुरूच असून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे. तर बिल्डर ने पालव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दिव्यातील सोनू पॅलेस या इमारतीमध्ये विजया पालव राहतात. त्या इमारतीची देखभाल चेतन पाटील हे पाहतात. मात्र यावेळी इमारतीत बाहेरील व्यक्ती आल्यामुळे त्यांनी व्यक्तीला हटकले आणि ज्या व्यक्तीने बोलावले त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर विजया पालव आणि चेतन पाटील या दोघांचे कुटुंब समोरासमोर आले. त्यांच्यात वादविवाद होऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली आहे.