चीनमध्ये करोनाने पुन्हा
एकदा डोकं वर काढलं
चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. करोना रोखण्यासाठी स्थानिक सरकारनं निर्बंध कडक केले आहे. त्यामुळे याचा फटका उत्पादन क्षेत्रालाही बसला आहे. टेस्ला कंपनीने आपल्या शांघाय प्लांटमधील उत्पादन कमीत कमी चार दिवसांसाठी बंद करण्याची योजना आखली आहे. टेस्लाच्या देशाबाहेरील पहिल्या गिगाफॅक्टरीने गेल्या वर्षी अर्ध्याहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केले. या महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस उत्पादन स्थगित करावे लागल्याने उत्पादन क्षमतेला खिळ बसली.
अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा
झाले करोना मुक्त
भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा ही दोन राज्ये अॕक्टीव्ह कोविड केसेसपासून मुक्त झाली आहेत. अरुणाचाल प्रदेश शनिवारी रात्री अॕक्टीव्ह केसेसपासून मुक्त झाले तर त्रिपुरा आठवडाभरापूर्वीचे कोविड केसेसपासून मुक्त झाले आहे. याचबरोबर शनिवारी आसाममध्ये देखील करोनाचे अॕक्टीव्ह रुग्ण आढळले नाहीत. ईशान्येकडील राज्यात कोविडचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
आमदारांना योग्य किंमत घेऊन
घर दिली पाहिजे : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या घरांबाबत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीने आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध केलाय. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन घर दिली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
आघाडीत खदखद उघड, आमदार सावंत
म्हणतात आम्ही आदेशाची वाट पाहतोय
निधी वाटपावरून महाविकास आघाडीत खदखद कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एवढच नाही तर “आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय.” असंही तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलं आहे.
भाजपा, तृणमूलच्या आमदारांमध्ये
पश्चिम बंगाल विधानसभेत हाणामारी
पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा झाला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे. विधानसभेतील व्हिडीओ आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. “ मला ढकललं, शर्ट फाडला,” असं ते सांगत आहेत.
वॉर्नर ब्रदर्स च्या ‘डय़ून’ चित्रपटाला
सर्वाधिक ६ ऑस्कर पुरस्कार
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारावर नाव कोरले. ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.
ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने सुत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. करोना नंतर दोन वर्षांनी यंदा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे. त्यानंतर आता विल स्मिथचा माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मंत्री नवाब मलिक यांची खाती काढली,
टोपे, आव्हाड यांच्याकडे केली सुपूर्त
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलीय. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस केली. यानुसार राज्यपालांनी मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवली आहे. मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिला.
तालिबानी फतवा; स्त्री पुरुषांना
उद्यानामध्ये एकत्र फिरण्यास बंदी
अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर आता तालिबानने स्त्री पुरुष असा भेद करण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या उद्यानांमध्ये आता पुरुष आणि स्त्री यांना एकत्र फिरता येणार नाहीये. पुरुषांनी बागेत फिरण्याचे दिवस वेगळे आणि स्त्रियांचे वेगळे असं ठरवून देण्यात आलं आहे. अशा नियमांमुळे अफगाणिस्तानातल्या स्त्री-पुरुष भेदभावात वाढ होणार आहे. उद्यानं, बागा यामध्ये पुरुषांना बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार या चार दिवशी जाता येणार आहे. तर उर्वरित दिवशी स्त्रियांना जाता येणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होत आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत राज्याचे गृहसचिव आनंद लिमये आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गाड्यांचीही होणार फिटनेट टेस्ट, नियमात केले बदल; सरकारने मागितला सुधारणा
सरकारी ठिकाणी नोकरीवर घेताना कर्मचाऱ्यांची शारीरिक चाचणी म्हणजेच फिटनेट टेस्ट घेतली जाते. फिटनेस सर्टिफिकेट जमा केल्याशिवाय कर्मचारी भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, याबाबत तुम्ही ऐकलं असेल. याच धर्तीवर वाहनांची फिटनेस टेस्ट ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमध्ये होते. हे ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन स्थापन करण्यासाठीच्या पात्रता निकषांमध्ये सरकारनं काही सुधारणा सुचवल्या आहेत. यामुळे एका राज्यात रजिस्टर्ड असलेल्या वाहनांची दुसऱ्या राज्यात फिटनेस टेस्ट करणं शक्य होणार आहे.
विमानाला अपघात; उड्डाण घेण्यापूर्वीच विजेच्या खांबाला दिली धडक, मोठी दुर्घटना टळली!
आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर एक मोठा अपघात टळल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोमवारी सकाळी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या एका प्रवाशांनी भरलेल्या विमानाच्या विग्सचा एक भाग पूश बॅक होताना विजेच्या खांबाला टक्कर दिली. यानंतर सर्व प्रवाशांना विमानाने रवाना करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणालाही जखम झाली नाही. स्पाइस जेटकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. स्पाइसजेट प्रवक्ताने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, आज स्पाइसजेटचं उड्डान एसजी 160 दिल्ली आणि जम्मूदरम्यान संचालित होणार होती. पूश बँक करीत असताना राइट विंग ट्रेलिंग एज एक पोलला धडकला. ज्यामुळे एलेरॉनचं नुकसान झालं. उड्डाण संचलित करण्यासाठी एक रिप्लेसमेंट एअरक्राफ्टची व्यवस्था करण्यात आली.
पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजप – तृणमूल काँग्रेसचे आमदार भिडले, 5 आमदार निलंबित
पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचारावर चर्चेची मागणी करत भाजप आमदारांनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चक्क हाणामारी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
‘या’ हिंदू मंदिरात मुस्लिम भाविकांची असते दर्शनासाठी रांग, पहा काय आहे परंपरा
हिंदू धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर जवळपास 1.40 अब्ज लोक हिंदू धर्माचं पालन करतात. हा धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. भारतच उगमस्थान असल्यामुळे सहाजिकच आपल्या देशात हिंदूधर्मियांची संख्या जास्त आहे. असं असलं तरीही भारतामध्ये हिंदू धर्मासोबत इतर अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. फक्त राहतच नाहीत तर एकमेकांच्या आराध्य देवतांचा आदरही करतात. आंध्र प्रदेशातील कडापा शहराकडे पाहिलं की याची प्रचिती येते. हे शहर गेल्या कित्येक शतकांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचं उदाहरण सादर करत आलं आहे.तेलुगू नववर्ष उगादीच्या निमित्ताने येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिरात हजारो मुस्लिम बांधव दर्शनासाठी येतात. या ठिकाणी तुम्हाला बुरखा घातलेल्या मुस्लिम महिला आशीर्वाद घेताना आणि आरतीला उपस्थित राहताना दिसतात. इतर अनेक मुस्लिम बांधवांप्रमाणं बी चाँद बाशा हेदेखील आपल्या पत्नीला सोबत घेऊन दरवर्षी मंदिरात दर्शनासाठी जातात. द टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
SD social media
9850 60 35 90