11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बाप, भाऊ, मामा आणि आजोबाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिचा बाप, भाऊ, मामा आणि आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित ‘गुड टच, बॅड टच‘ या सत्रात या धक्कादायक अत्याचाराबाबत सांगितले. पीडित मुलीने तिच्या समुपदेशकांजवळ सर्व प्रकार सांगितला. नंतर समुपदेशकांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी असून ते सध्या पुण्यात वास्तव्याला आहेत.

पीडितेवर मागील पाच वर्षे बलात्कार, विनयभंग
पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या किशोरवयीन भावाने आणि बापाने वेगवेगळ्या वेळी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर मुलीचे आजोबा आणि मामाने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पुणे पोलिसांनी शनिवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत हे गुन्हे घडले आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलीला बिहारमध्ये राहत असताना सन 2017 पासून लैंगिक अत्याचार सहन करावा लागल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘गुड टच आणि बॅड टच’ सत्रादरम्यान स्वतःवरील लैंगिक अत्याचाराबाबत तोंड उघडले, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांनी सांगितले. तक्रारीचा संदर्भ देत अधिक माहिती देताना सातपुते यांनी सांगितले की, 2017 मध्ये पीडित मुलीच्या बापाने तिचा लैंगिक छळ सुरू केला होता. त्यानंतर मुलीच्या मोठ्या भावाने नोव्हेंबर 2020 च्या सुमारास तिचा लैंगिक छळ सुरू केला. तसेच मुलीच्या आजोबा आणि मामाने तिला अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केला. सर्व घटना वेगवेगळ्या वेळी घडल्या. तसेच आरोपींना एकमेकांच्या गैरकृत्यांची माहिती नसल्याने हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण नाही. या प्रकरणात पॉक्सो कायद्याची कलमेदेखील जोडली जातील, असे पोलीस निरीक्षक सातपुते यांनी स्पष्ट केले.

पीडितेचे मुलीचे आईवडील मूकबधिर आहेत. पीडित मुलगी पुण्यातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेते. पुण्याव्यतिरिक्त बिहारमधील तिच्या मूळ गावीही मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे पोलिसांची एक टीम लवकरच बिहारमध्येही जाऊन अधिक तपास करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.