नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान असलेल्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशीरा ही आग लागली. डोंगरावर वाळलेले गवत आणि झाडे असल्यामुळे आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. आगीची घटना कळताच मालेगाव अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी पोहोचले.
करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान येणाऱ्या हाताने शिवारातील डोंगराला ही आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत लाखो रुपयांची नौसर्गिक साधनसंपत्ती जळून खाक झालीये. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही.
डोंगराला आग लागल्याची घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमक दलाला दिली. अग्निशमक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.
डोंगराला आग लागली त्या डोंगरावर सप्तश्रृंगी देवीचे मंदीर देखील आहे. या डोंगराला आग लागताच अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातून आग आणि धुराचे लोट दिसत होते.
चिंतेची गोष्ट म्हणजे या डोंगराच्या आजूबाजूला मानवी वस्ती आहे. ही आग त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ झाला असता.