म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. त्यामुळे या पुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. शिवाय पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. रविवारी म्हाडाच्या परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली असल्याने पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पेपर फुटण्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या संदर्भात आव्हाड यांनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता, असं आव्हाड यांनी सांगितलं.
पेपर फोडणाऱ्या काही टोळ्या सध्या कार्यान्वित आहेत. त्या उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. म्हाडा आणि पोलिसांनी एकत्रितपणे ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पेपर फुटण्याच्या आधीच आपण परीक्षा रद्द करण्यात आली. जर, पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ती नामुष्की ठरली असती. शिवाय, अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींवर अन्यायकारक ठरले असते. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस एकाचवेळेस कामाला लागले आणि वशिल्याचे तट्टू म्हाडामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम केले, असंही त्यांनी सांगितलं.
वास्तविक पाहता, या प्रकरणात मी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. पण, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी आपण आक्रमक भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वीच याच कंपनीने पुणे पोलीस दलाची परीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास तरी कसा दाखवणार? असा सवाल करून परीक्षा रद्द केल्याबद्दल आपण विद्यार्थ्यांची माफी मागत आहोत. मात्र, ही परीक्षा रद्द करून, वशिल्याचे तट्टू बाजूला सारून हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.