नाशिकमधल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाने यूपीएससीत देशात आठवा क्रमांक पटकावला

मेहनतीच्या बळावर कुठलेही शिखर पादाक्रांत करता येते. त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असावे लागते आणि मनात प्रचंड आशावाद. कसलेही संकट आले तरी त्याला भिरकावून देऊ, ही उदंड इच्छाशक्ती. याच बळावर नाशिकमधल्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाने चक्क यूपीएससीत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. या तरुण मुलाचे नाव अथर्व पवार असून, त्याची केंद्रीय जलमंत्रालयात भूवैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली आहे. अथर्वचा हा प्रवास नक्कीच सर्वसामान्यातल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल असाच आहे.

अर्थवचे सिडको भागात घर आहे. त्याचे वडील एचएएलमध्ये कंत्राटी कामगार, तर आई गृहिणी. अथर्वला निसर्गाची खूप आवड. अगदी लहानपणापासून तो निसर्गात रमायचा. त्यातूनच तो भूगर्भशास्त्राकडे ओढला गेला. पुढे मोठा झाला तसा या क्षेत्रातली आवड तर वाढलीच. सोबतच यातच करिअर करायचे, असा निश्चय त्याने केला.

अथर्वचे प्राथमिक शिक्षण सेंट्र फ्रान्सिस स्कूलमध्ये झाले. औरंगाबाद येथील सैनिकी महाविद्यालयात अकरावी बारावी केली. पुन्हा केटीएचएम कॉलेजमध्ये जिओलॉजीत बीएससी केली. त्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, तो फक्त प्रशासकीय सेवेत रमला नाही. त्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्न केले आणि भूवैज्ञानिकाची परीक्षा दिली. त्यात तो देशात चक्क आठवा आला आहे.

अथर्ववर केंद्रीय जलमंत्रालयात पाणी संशोधनाची जबाबदारी असणार आहे. विशेषतः दुष्काळ, पूर, नदीजोड प्रकल्प, धरणे कुठे बांधायची, बोगद्यातून बाहेर पडणारे पाणी अशा विषयांवर तो काम करणार आहे. सध्या हवामान बदलाचा मुद्दा जागतिक पातळीवर कळीचा झाला आहे. अशा या काळात अथर्वचे काम देशासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्या मुलाच्या या यशाने आई-वडिलांना आभाळ ठेंगणे झाले आहे. सध्याची मुले फक्त इंजीनिअरिंग आणि डॉक्टरकी याचा विचार करतात. अनेकजण फक्त स्पर्धा परीक्षेपुरतेच यूपीएससीकडे पाहतात. मात्र, अथर्वने करिअर आणि आवडीतून आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. त्याचा हा प्रवास नक्कीच वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या तरुणांना आदर्श ठरेल, असाच आहे.

यूपीएससी परीक्षा बाबत अधिक जाणून घ्या येथे :

https://upscgoal.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.