काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमुळे ठाकरे सरकार खरंच अडचणीत येणार?

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे मंत्री आपल्या मित्र पक्षांवर नाराज आहेत. त्यामुळे  काँग्रेस हायकमांडने आज महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या स्थानाविषयी चर्चा होणार आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या वृत्तावर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे गेले अडीच वर्षे चांगलं काम करत आहे. विकासाची कामे कुठेही थांबली नाहीत. विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राज्यात सुरु आहेत. काँग्रेसचे आमदार, मंत्री सर्व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी आज दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिली आहे. काँग्रेस हायकमांडने आज महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना खासदाराचीही नाराजी, महाविकास आघाडीत खरंच धुसफूस?

महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला खरंच धुसफूस आहे की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसबाबत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.