भारताने पाकिस्तान आणि
चीनला दिले बैठकीचे निमंत्रण
भारताने पाकिस्तान आणि चीनला दिल्लीतील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण दिलंय. ही बैठक अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर होणार आहे. यासाठी भारताने चीन, पाकिस्तानसह रशियालाही आमंत्रण दिलंय. या बैठकीत या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी भारताने १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा २ तारखा सुचवल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव असतानाही दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर होणाऱ्या या बैठकीचं निमंत्रण पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांना देण्यात आलंय.
काश्मीरमध्ये सईद गिलानी यांच्या
नातवाला सरकारी नोकरीतून काढले
दहशतवादी कारवायांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना सरकारी सेवेतून काढून टाकले. प्रशासनाने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून अनीसला सरकारी सेवेतून काढून टाकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) मध्ये संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे सेंटर जम्मू-काश्मीर सरकारच्या सर्वात प्रतिष्ठित अधिवेशन आणि परिषद सुविधांपैकी एक असून ते उच्चस्तरीय बैठका आणि व्हीव्हीआयपी परिषदांसाठी वापरले जाते.
नवज्योत सिद्धू यांनी मागण्यांसह
सादर केला तेरा कलमी अजेंडा
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घमासान सुरूच आहे. त्यामुळे काँग्रेसचे संकट अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे आणि नंतर नाट्यमय पद्धतीने परत येणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आता नवी मागणी केली आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मागणीसह १३ कलमी अजेंडा सादर केला आहे. सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
गांजा मारून बेताल बोलताय, त्यांची
नार्को टेस्ट करा : संजय राऊत
शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उद्देशून एक खळबळजनक विधान केलं आहे. मला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्त निर्माण झालंय आणि काही लोक गांजा मारून काम करतात, हे दिसतय.. दसरा मेळव्यानंतर मला वारंवार दिसतय की, ज्या प्रकारे विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? त्यांना कुणी पुरवतं का? हे फार गरजेचं आहे. मला इथे(सिल्वासा) पण तेच दिसतय. इतक्या बेधुंदपणे कुणी कारभार करू शकत नाही. ” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
इंधन खरेदीसाठी श्रीलंकेने
भारताला मागितले कर्ज
तीव्र परकीय चलन संकटात कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी श्रीलंकेने भारताकडून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज मागितले आहे. देशात सध्याच्या इंधन उपलब्धतेची हमी पुढील जानेवारीपर्यंतच दिली जाऊ शकते, असा इशारा श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री उदय गमनापिला यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. दरम्यान भारत, पाकिस्तान प्रमाणेच श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ही वाढ चालूच असून देशात इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत.
पुण्यात वाहतूक पोलिसाला
नेले फरफटत
पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका माजोरड्या वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलंय. हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व प्रकारानंतर या मुजोर वाहनचालकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या मुंढवा भागात हा धक्कादायक प्रकार घडला. प्रशांत श्रीधर कांतावर असं या वाहनचालकाचं नाव आहे. त्यानं पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांच्या अंगावर गाडी घातली.
कोरोनाच्या रुग्णांपैकी 82 टक्के रुग्ण
सहा जिल्ह्यात असल्याची माहिती समोर
मुंबईत तिसरी लाट नाही असा दावा पालिकेने केला. मात्र गर्दीमुळे रोजच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यात अडीचपट रुग्णवाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णसंख्या सहा जिल्हांत असल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आहेत. तर विदर्भात करोनाची स्थिती सर्वात चांगली असून विदर्भात कोरोनाचे केवळ 207 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक 8 हजार 79 सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर 6 हजार 255 रुग्ण मुंबईत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते
सुरेश किसन वीर यांची निधन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश किसन वीर उर्फ (आण्णा) (वय ८२) यांची आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सत्यजित व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश (आण्णा) किसन वीर हे वाईच्या जनता शिक्षण संस्थेचे व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
ठाकरेंची मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती
मीच आग्रह केला : शरद पवार
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. अहंमपणा डोक्यात जाऊ द्यायचा नसतो असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. त्याला विरोधी फडणवीस देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणे आणि राज ठाकरेंना पक्षाबाहेर का जावं लागलं? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती मीच त्यांना आग्रह केला असं पवारांनी म्हंटलं आहे.
रत्नं आणि दागिन्यांच्या निर्यातीत
29.67 टक्क्यांनी वाढ
भारतातून होणाऱ्या रत्नं आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय भर पडली आहे. ही निर्यात सप्टेंबर 2021 मध्ये 29.67 टक्क्यांनी वाढून 23,259.55 कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलकडून ही माहिती देण्यात आली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 17,936.86 कोटी रुपये होता. त्याच वेळी, सप्टेंबर 2019 मध्ये 23,491.20 कोटी रुपयांची रत्नं आणि दागिने निर्यात झाली होती.
बँक आॕफ इंडिया स्वस्त दरात देतेय गृह आणि वाहन कर्ज
सणासुदीच्या काळात काहीतरी मोठी खरेदी करण्याचा विचार अनेकांचा असतो. सणाच्या काळात घरं किंवा वाहनांची देखील खरेदी केली जाते. तुम्ही यावर्षी या फेस्टिव्ह सीझनमध्ये घर, फ्लॅट किंवा वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल तर विविध बँका होम लोन आणि व्हेइकल लोनसाठी बंपर ऑफर्स घेऊन आल्या आहेत.
फेस्टिव सीझन मध्ये आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या होम लोन आणि ऑटो लोन वर सूट देण्याची घोषणा आहे. सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या गृह कर्जावरील व्याजदर 0.35 टक्क्यांनी कमी केला आहे. याशिवाय बँकेने वाहन कर्जावरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कपातीनंतर बीओआयचा गृहकर्ज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होईल. पूर्वी हा दर 6.85 टक्के होता. त्याचबरोबर बँकेच्या वाहन कर्जावरील व्याजदर 7.35 वरून 6.85 टक्क्यांवर करण्यात आला आहे.
यूएईत रंगणार T20 World Cup चा थरार
आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट वेड्यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज 17 आॕक्टोबर रोजी पुरुषांच्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
टी-20 वर्ल्डकप कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जात आहे. ठिकाण बदललं असलं तरी स्पर्धेची उत्सुकता मात्र तिळभरही कमी झालेली नाही. विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमन देशात घेण्यात येणार असल्याचे माहिती याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी पहिला सामना पार पडणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे.विशेष म्हणजे या भव्य स्पर्धेचे सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॕकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे. या पात्रता फेरीत दोन ग्रुप आहेत. ग्रुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया तर ग्रुप बी मध्ये ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि बांगलादेश हे संघ आहे. दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.
T20 World Cup च्या महामुकाबल्यासाठी शोएब अख्तर तयार, भारत-पाकिस्तान सामन्याआधी कपिल-गावसकरांना मसाज!
टी-20 वर्ल्ड कपला आजपासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे, पण तरीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती 24 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची. या मॅचपासूनच भारत-पाकिस्तान आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने ट्विटरवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये शोएब भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि कपिल देव यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासही दिसत आहेत.
‘बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडूंसोबत मजा करत आहे. महान झहीर अब्बास, सुनिल गावसकर आणि कपिल देव. आम्ही क्रिकेटच्या महामुकाबल्यासाठी पूर्णपणे तयार आहोत,’ असं कॅप्शन शोएबने या फोटोला दिलं. शोएबने जो फोटो शेयर केला त्यात तो गावसकर आणि कपिल देव यांच्या खांद्याला मसाज करत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.
SD social media
9850 60 3590