राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांना आता स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर (सेल्फ फायनान्स) नवीन महाविद्यालये सुरू करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे, भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुदानाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र या महाविद्यालयांना १०० रुपयांच्या मुद्रांक पत्रावर लिहून द्यावे लागणार आहे.
कायम विनाअनुदानित संवर्गातून राज्यभरातील १४२ नवीन महाविद्यालयांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ही महाविद्यालये रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित केली जाणार आहेत. त्यापैकी ३४ महाविद्यालये नागपूर तर ३७ महाविद्यालये अमरावती विभागातील आहेत. उर्वरित महाविद्यालये औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नांदेड आणि पनवेल या विभागातील आहेत. या महाविद्यालयांना विनाअनुदान तत्त्वावर मान्यता मिळणार आहे. शासनाकडून अनुदानच मिळणार नसल्याने महाविद्यालयांकडून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी शुल्काच्या नावावर मोठी रक्कम उकळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, ग्रामीण आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयांमधील शिक्षण कितपत परवडेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.