आज दि.७ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

तुर्कस्तानची जमीन अजूनही थरथरतेय; आतापर्यंत 100हून अधिक आफ्टरशॉक

अजूनही तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. शक्तिशाली भूकंपानंतर आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. इथल्या भयंकर विध्वंसाने लोक भयभीत झाले आहेत. विवादित तुर्की-सीरियन प्रांत हातेमध्ये आपत्कालीन कर्मचारी ढिगाऱ्यातून वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. जखमींच्या श्वासोच्छवासाच्या आवाजावरून ते कुठे दबले आहेत का? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुर्कस्तानमधील हाते येथे कोसळलेल्या इमारतींचे हवाई दृश्य. यात संकट किती मोठं आहे, याची कल्पना येते. सर्व घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारंपारिक शेती सोडून उपसरपंचाने सुरु केली थाय अ‍ॅप्पलची शेती, कमावताय लाखोंचे उत्पन्न!

राजस्थानातील करौली भागातील बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती करतात. त्यामुळे त्यांना फक्त घर चालवण्यापुरताच मिळतो. मात्र सध्या तोडाभीम भागातील खेडी गावचे उपसरपंच नरहरी मीना यांनी शेतीत नाविन्य आणून पारंपरिक शेतीऐवजी थाई सफरचंदाची लागवड सुरू केली आहे.थाई सफरचंद हे थायलंडचे मुख्य फळ आहे. भारतात, थाई सफरचंद विशेषतः कोलकाता येथे उत्पादित केले जाते. तेथून थाई सफरचंदाची लागवड पाहून खेडी गावच्या उपसरपंचांनीही त्याची सुरुवात केली आहे. आता त्यांना वार्षिक लाखात उत्पन्न मिळत आहे.खेडीचे उपसरपंच शेतकरी नरहरी मीना सांगतात की, आमचे आई-वडील आणि वडील अनेक पिढ्यांपासून पारंपरिक शेती करत आहेत. गहू, हरभरा, मोहरी या पारंपरिक शेतीतूनच आपण पोट भरू शकतो. चांगल्या उत्पन्नासाठी मी यावेळी माझ्या शेतात 2 बिघा जागेत थाई सफरचंदाची बाग लावली आहे.

टिकटॉकवर भीक मागून भिकारी होत आहेत मालामाल; रस्त्यावर भटकण्यापेक्षा व्हिडिओद्वारे मिळवतात पैसे

मनोरंजन आणि नातलगांच्या संपर्कात राहण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे उत्पन्नाचं प्रभावी माध्यम बनले आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  जगातल्या अनेक देशांमध्ये रस्त्यावर भीक मागताना भिकारी दिसतात. काही जण त्यांना पैसेही देतात. अलीकडे काही भिकारी ऑनलाइन पेमेंट देखील घेतात; मात्र इंडोनेशियातील भिकाऱ्यांची कथा थोडी वेगळी आहे. या देशातले भिकारी चक्क सोशल मीडियाच्या माध्यमातून भीक मागून मालामाल होत आहेत.

फक्त भिकचं नाही तर ते लोकांकडे ऑनलाइन गिफ्टदेखील मागताना दिसतात. यासाठी इंडोनेशियातले भिकारी टिकटॉकचा वापर करत आहेत. या प्रकाराची माहिती सरकारला मिळाली असून, असे प्रकार रोखण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एका भारतीय वृत्तवाहिनीने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी मोठी लाच, लातूरमध्ये महावितरणच्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले

राज्यात दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यातच लाचखोरीचेही प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. लातूर मधूनही लाचखोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याचा विद्युतपंप सुरू ठेवण्यासाठी 25 हजारांची मागणी करण्यात आली होती. यानंतर तडजोड करुन 10 हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

क्रिती आणि प्रभास ‘या’ दिवशी उरकणार साखरपुडा? त्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. मध्यंतरी क्रिती सेननचं नाव तिचा ‘आदिपुरुष’चा सह-कलाकार प्रभास सोबत जोडलं गेलं होतं.  क्रिती आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात होतं. इतकेच नाही तर प्रभासने आदिपुरुषच्या सेटवर गुडघ्यावर बसून प्रपोज केले आणि क्रितीने त्याला लग्नासाठी ‘हो’ म्हटले, असा दावाही करण्यात आला होता.  मात्र क्रितीने त्या सगळ्या फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा या दोघांचं नाव चर्चेत आलं आहे.साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत की दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता दोन्ही कलाकारांच्या एंगेजमेंटची बातमी समोर येत आहे. विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीबद्दल एक ट्विट केली जे चर्चेत आलं आहे.

सुबोध भावेनंतर ‘हा’ अभिनेता साकारणार बालगंधर्वांची भूमिका

सुबोध भावेने बालगंधर्वांची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. आता त्यांच्यानंतर मराठीतील प्रसिद्ध अभिनेता ही भूमिका साकारणार आहे.कलर्स मराठीवर सुरू असलेली योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका लोकप्रिय आहे. यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे.आता या मालिकेला नवीन वळण लागणार आहे. ते म्हणजे मालिकेत बालगंधर्व दाखवले जाणार आहेत.मालिकेत बालगंधर्वांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता अभिजित केळकर साकारणार आहे.नुकतेच अभिजीतचे या रूपातील फोटो समोर आले आहेत.

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक

राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एवढे दिवस तिने लग्न केल्याची चर्चा रंगली होती. पण आता लग्न मोडल्याची चर्चा आहे. तिने मीडियासमोर येत पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप केले होते. तिने 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. आता तिने असा दावा केला की आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने तिला लग्न लपवण्यास भाग पाडले. त्याच्या गर्लफ्रेंडची माहिती सुद्धा राखीने मीडियाला सांगितली आहे. राखीने पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप ठेवत तक्रार दाखल केली होती. आता अदिलविषयी मोठी बातमी समोर येत आहे.

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी आज दुपारी अटक केली. सोमवारी रात्री राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मीडिया रिपोर्टनुसार मंगळवारी आदिलला राखीच्या घरातूनच अटक करण्यात आली. राखीने पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप ठेवत ही तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आदिलला अटक केली. राखीने पती आदिलच्या गर्लफ्रेंडबद्दलही खुलासा केला होता.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! 11 लाख जणांना मोफत जेवण दिलेलं अन्नछत्र

उस्मानाबाद जिल्हा हा कमी पर्जन्यमानामुळे कायमस्वरूपी दुष्काळी आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहरात सुसज्ज असे खाजगी रुग्णालय नसल्याने रुग्णांसाठी एकमेव पर्याय हा जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. अ‍ॅडमीट होणारे सर्व रुग्ण हे गोरगरीब सामान्य नागरिक असतात. रुग्ण रुग्णालयात अ‍ॅडमीट झाल्यानंतर त्यांचे आणि नातेवाईकांचे जेवणासाठी हाल होतात. हीच बाब लक्षात घेता उस्मानाबाद शहरातील अन्नपूर्णा ग्रुप तर्फे मोफत जेवण दिले जाते.शहरातमध्ये मारवाडी गल्ली येथे 7 वर्षांपूर्वी अन्नपूर्णा ग्रुपकडून अन्नछत्राची स्थापना करण्यात आली. या अन्नछत्रामुळे रुग्णांचे आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे जेवणाचे हाल संपुष्टात आले. अन्नछत्रांमध्ये दररोज दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता मोफत अन्नदान केले जाते. या जेवणाचा आस्वाद सरासरी दररोज 600 लोक घेत असतात.

अन्नपूर्णा ग्रुप मार्फत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. माझी चिऊ आता नको भिऊ, बेटी बचाओ बेटी पढाओ, मोतीबिंदू ऑपरेशन, व्यसनमुक्ती असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. अन्नछत्राची स्थापना झाल्यापासून गेल्या 7 वर्षात 11 लाख गरजू लोकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला आहे. तसेच या ग्रुप मार्फत मागील 4 वर्षांपासून शहरात मापक दरात स्वर्गरथ सेवा चालू आहे, असं अन्नपूर्णा ग्रुपचे संस्थापक सदस्य अतुल अजमेरा यांनी सांगितले.

टीम इंडियाच्या प्लेयिंग 11 मधून सूर्यकुमार, अक्षर पटेल बाहेर!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला शुक्रवार 9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून याकरता भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याला भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये सहभागी केले नाही.भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेयिंग 11 निवडली आहे. यात वसीम जाफरने कर्णधार रोहित शर्माला सलामीचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून त्याच्या जोडीला सलामीसाठी के एल राहुलची निवड केली आहे. जाफरने तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा याला स्थान दिले असून चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीची निवड केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिओनेल मेस्सीची जर्सी मिळाली भेट

कर्नाटकातील बंगळुरू येथे भारतीय ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याला सप्ताहाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदींना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नावाची जर्सी भेट देण्यात आली.अर्जेंटिनाची ऊर्जा कंपनी YPF चे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी पंतप्रधान मोदींना लिओनेल मेस्सीचे नाव असलेली अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाची जर्सी भेट दिली. YPF ही कंपनी मागील अनेक वर्षांपासून अर्जेंटिनाच्या टीमची स्पॉन्सर आहे. त्यांच्या कंपनीने नाव मागील अनेक वर्षांपासून अर्जेंटिनाच्या जर्सीवर झळकताना पहावयास मिळते.

पाकिस्तानची इथेही आगळीक; भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी जाणाऱ्या भारतीय विमानाला एअरस्पेस परवानगी नाकारली!

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठा विध्वसं झाला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत ५,००० हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. तुर्कस्तानात शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या इमारतींच्या मलब्याखाली हजारो लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. अनेक ठिकाणी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या भूकंपानंतर तुर्कस्तानात तिथल्या सरकारकडून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, तुर्कस्तानच्या मदतीसाठी भारतासह जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. परंतु यादरम्यान, पाकिस्तानने मात्र त्यांची हेकेखोर वृती पुन्हा एकदा दाखवली.स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणाऱ्या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. वृत्तवाहिनी WION च्या वेबसाईटने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. मदतकार्यासाठी तुर्कस्तानला जाणाऱ्या भारतीय विमानाला हवाई क्षेत्र देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.

शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकले सिद्धार्थ-कियारा; अडवाणींची लेक झाली मल्होत्रांच्या घरची सून

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. गेले अनेक महिने ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर हे दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. एएनआयने ट्विट करुन त्याबाबत अधिकृत माहितीही दिली आहे.

परवा यांच्या लग्नाची मेहंदी, काल हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर आज दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली आहेत. लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं घेतली होती. त्यामुळे अद्याप या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.