आज दि.३० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. मुर्मू यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभा पाटील यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल देऊन गौरविले.

कृष्णा नदीतील प्रदुषणाबद्दल तीन कारखान्यांना ४ कोटी ४६ लाखांचा दंड

दुषित पाणी सोडल्याने कृष्णेचे पाणी प्रदुषित केल्या बद्दल राजारामबापू, हुतात्मा आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्यांना ४ कोटी ४६ लाख रूपये पर्यावरण दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निश्‍चित करण्यात आला आहे. तर सांगली महापालिकेला लागू होणार्‍या दंडाची रक्कम मोठी असल्याने त्याची गणती करण्यासाठी मुदत मागण्यात आली असल्याचे याचिकाकर्ते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत सांगितले.कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये लाखो माशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती.

जी-२० च्या उरलेल्या निधीतून नागपुरात विकासकामे होणार, राज्य सरकारकडून महापालिकेला परवानगी

शासनाकडून मिळालेल्या निधीचा अपव्यय करत करदात्यांच्या पैशाचा चुराडा करणे स्थानिक स्वराज्य संस्थासाठी नवे नाही. मात्र, नागपूर महापालिका याला काहीशी अपवाद ठरली आहे. मार्च महिन्यात शहरात झालेल्या जी-२० परिषदेपूर्वीच्या विविध विकासकामे व शहर सौंदर्यीकरणासाठी मिळालेला निधी महापालिकेने वाचवला आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या या निधीतून आता शहरातील विविध ठिकाणाचे सौंदर्यीकरण व विकासकामांसाठी वापरण्याची परवानगी राज्य सरकारने महापालिकेला दिली आहे.

हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशानासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती आहे, तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.या अधिवेशनात तीन आठवड्यांचे कामकाज प्रस्तावित केले आहे. यात सुट्यांसह अधिवेशनाचे एकूण १४ दिवस असेल. यात एकूण प्रत्यक्ष कामकाजाचे १० दिवस आहे. गुरुवार, ७ डिसेंबरला पहिल्या दिवशी अध्यादेश सभागृहाच्या पटलावर टेवण्यात येतील. यासोबतच २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज व शोक प्रस्ताव असेल. शुक्रवार, ८ डिसेंबरलाही शासकीय व अशासकीय ठराव असतील. त्यानंतर दोन दिवस सुटी असेल.

“सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि…”; कोका-कोलावर बोलताना एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरू झालेल्या कोको-कोला कंपनीच्या प्रकल्पाचं स्वागत केलं. तसेच कोका-कोला कंपनीची २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती, असं नमूद केलं. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्याचाही उल्लेख केला. यावेळी शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका करत ठाकरे गटाला लक्ष्य केलं.एकनाथ शिंदे म्हणाले, “कोका-कोला कंपनीचे देशभरात विविध ६० उत्पादनं आहेत. तेथे आज हजारो कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने २०२३ मध्ये भारतात एकूण १२ हजार ८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोका-कोलासारखी कंपनी रत्नागिरीत उभी राहत आहे. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सरकारची स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. व्यवस्थापनानेही या कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.”

“सबसिडीसह देशात कुठलीच गोष्ट मोफत दिली जाऊ नये”, नारायण मूर्तींचं वक्तव्य

आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असं वक्तव्य इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केलं होतं. त्यांच्या मते भारतात काम करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. ती वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करायला हवं. मूर्ती यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. दरम्यान, नारायण मूर्ती यांनी आता असंच आणखी एक वक्तव्य केलं आहे.नारायण मूर्ती म्हणाले, “देशात कुठलीच गोष्ट मोफत दिली जाऊ नये”. बंगळुरू येथे आयोजित टेक समिट २०२३ मध्ये ते बोलत होते. मूर्ती म्हणाले, मी कोणत्याही मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही. परंतु, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सबसिडीचा लाभ घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे. 

तेलंगणात BRS ला धक्का? एग्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूने

आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल सध्या कळीचा मुद्दा ठरले आहेत. या एग्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यानुसार प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकांसंदर्भातल्या आपापल्या धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंडिया टुडे

भाजपा – ३६ ते ४६ जागा

काँग्रेस – ४० ते ५० जागा

एबीपी न्यूज-सी वोटर

भाजपा – ३६ ते ४८ जागा

काँग्रेस – ४१ ते ५३ जागा

इंडिया टीव्ही

भाजपा – ३० ते ४० जागा

काँग्रेस – ४६ ते ५६ जागा

जन की बात

भाजपा – ३४ ते ४५ जागा

काँग्रेस – ४२ ते ५३ जागा

दैनिक भास्कर

भाजपा – ३५ ते ४५ जागा

काँग्रेस – ४६ ते ५५ जागा

टीम साऊदीने केला नवा विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सिल्हेट येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार साऊदीने पहिल्या कसोटी सामन्यात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर तो एका खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना साऊदीने ६५ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ३ चौकारही मारले. ही खेळी खेळताना त्याने त्याच्या २००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. साऊदीने आतापर्यंत एकूण ९५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १३५ डावांमध्ये ६ अर्धशतकांसह २०११ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी १६.२१ इतकी आहे. या डावात टीम साऊदीची सर्वोत्तम धावसंख्या ७७ नाबाद आहे. याशिवाय त्याने आतापर्यंत कसोटीत ३०० विकेट्स घेतल्या आहेत.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.