घरावर पेट्रोल टाकून एका कुटुंबातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पोलिसांना भीती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे आरोपींपैकी एकजण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील उघड झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील दहाचाळ, राहुल नगर परिसरात तक्रारदार अपेक्षा अहिरे ही विवाहित महिला पती आणि आईसोबत राहते. तक्रारदार महिलेचा भाऊ सतीश कांबळे आणि आरोपी सोमनाथ वाघ यांच्यात जुन्या भांडणाचा राग होता. याच रागातून 9 जुलै रोजी आरोपी सोमनाथ वाघ याच्यासह मोन्या आणि कुणाल हे सतीश कांबळे याच्या घरी गेले. त्यांनी सतीशच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावली आणि घरातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी सोमनाथ वाघ, मोन्या आणि कुणाल यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या विरोधात आयपीसी 307 नुसार हत्येचा प्रयत्न, आयपीसी 436 नुसार स्फोटक पदार्थांचा वापर करून घर जाळण्याचा प्रयत्न करणे, आणि कलम 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींपैकी सोमनाथ वाघ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपाराची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली असून सर्वसामान्यांकडून पोलिसांनी अशा आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे