वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याचा राग येऊन दहावीच्या विद्यार्थ्याने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ओम मनिष मिश्रा (15) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
अभ्यास करायला सांगितले म्हणून आत्महत्या
ठाण्यातील निळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीत ओम मिश्रा आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. ओम रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकतो.
सध्या ओमची शालांत परीक्षा सुरु आहे. शनिवारी ओम विज्ञानचा पेपर देऊन घरी आला. घरी आल्यानंतर काही वेळानंतर वडिलांनी त्याला अभ्यास कर असे सांगितले. यामुळे ओमला राग आला आणि त्याने आई-वडिलांसमोरच 19 व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. वैष्णवी रमेश काकडे (22) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वडिलांच्या नावे सुसाईड नोट लिहून वैष्णवीने आत्महत्या केली. ‘सॉरी बाबा..मी डॉक्टर होण्याचे तुमचे स्वन पूर्ण करू न शकल्याने माफ करा’ असे चिट्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली. वैष्णवी ही औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.