दारूविक्रीसाठी परवाना गरजेचा असतो. परंतु, अनेकदा विनापरवाना म्हणजेच अवैध पद्धतीने दारूविक्री केली जाते. यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अवैध दारूविक्रीसाठी संबंधित व्यक्ती अनेकविध क्लृप्त्यांचा वापर करतात; पण पोलीस यंत्रणा अशा व्यक्तींवर कारवाई करते. मध्य प्रदेशात अशाच एका अवैध दारूविक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता, पोलीस पथकाला एक धक्कादायक गोष्ट या घटनास्थळी दिसून आली. हँडपंपचा वापर पाण्यासाठी केला जातो, हे सर्वांनाच माहिती आहे; पण मध्य प्रदेशात अवैध दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी हँडपंपमधून चक्क दारू येत होती. हे पाहून पोलिसांना क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. `नवभारत टाइम्स`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
हँडपंप अर्थात हातपंपाचा वापर पाण्यासाठी केला जातो हे आपण जाणतोच. परंतु, मध्य प्रदेशात हातपंपातून दारू वाहू लागल्याने पोलीस पथकही क्षणभर आश्चर्यचकित झालं. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातल्या अवैध दारू अड्ड्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी रवाना झालं. घटनास्थळी तपास करताना पोलिसांना हातपंपातून दारू येत असल्याचं दिसलं. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हातपंपाजवळ खोदकाम केलं असता, हातपंपाखाली दारूनं भरलेला एक ड्रम आढळून आला. त्यात अवैधरित्या दारू साठवण्यात आली होती. पोलिसांनी ही दारू जप्त केली असून, या गुन्ह्यात सहभागी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
यापूर्वी शनिवारी (8 ऑक्टोबर) रात्री भोपाळमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या हुक्का लाउंज आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत पोलीस पथकाने ही कारवाई केली. याशिवाय अनेक ठिकाणी अवैध पद्धतीनं दारू विक्री होत असल्याचं पोलीस तपासात दिसून आलं. पोलिसांनी आरोपींविरोधात आयपीसी आणि मोटर वाहन कायद्याशी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हुक्का उपकरणं जप्त करून ती सील करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री भोपाळ शहरातल्या अनेक भागांत कारवाई सुरूच होती. 77 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक छापे टाकण्यात आले.
याशिवाय अवैध दारूविक्रीचा आरोप असलेल्या तीन ढाबामालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 19 तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पथकांनी सुमारे 150 वाहनांची तपासणी केली असता, त्यापैकी 21 जणांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात अवैध दारूविरोधातली कारवाई तीव्र होत आहे. शिवराजसिंह सरकारच्या आदेशानुसार, पोलीस आणि प्रशासनाचं पथक अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करत आहे. गुना, तसंच राजधानी भोपाळसह अन्य शहरांमध्ये पोलिसांनी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी अभियान सुरू केलं आहे.