टोयोटाने देशातील पहिली फ्लेक्स इंधन कार लॉन्च केली आहे, जी इलेक्ट्रिक आणि इथेनॉल या दोन्हीवर चालू शकते. या पथदर्शी प्रकल्पाच्या शुभारंभाला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी स्वतः उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही होते.
फ्लेक्स फ्युएल कारचा एक मोठा फायदा म्हणजे कार मालक कधीही इथेनॉलवर स्विच करू शकतो आणि त्यांना पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिक इंधनावर चालवू शकतो. सध्या भारतात इलेक्ट्रिक आणि इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे साहजिकच फ्लेक्स कार मालकांच्या खिशात जास्त पैसे वाचतील.शुभारंभानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टेस्ट ड्राईव्ह घेतली. तत्पूर्वी ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. कृषी क्षेत्रात 100% वाढ झाली तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. ही वाढ शेती आणि इथेनॉलशी जोडलेली आहे.
या कारमुळे पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. वातावरणात पेट्रोल आणि डिझेलचे कार्बन उत्सर्जन खूप जास्त आहे, तर इथेनॉल आणि इलेक्ट्रिक खूप कमी असेल. याशिवाय पिकांच्या जैव कचऱ्यापासून ते तयार होत असल्याने पिकांचे अवशेष जाळू न दिल्याने पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.आज पहिल्या फ्लेक्स-इंधन आधारित हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनाच्या लाँचिंगवेळी बोलताना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, येणारे काही दिवस दिल्लीसाठी खूप त्रासदायक असणार आहेत. कारण, शहराच्या आजूबाजूला पराळी जाळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत जैव कचऱ्यापासून इंधन तयार केले तर पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.