एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील असं बोललं जात होतं. मात्र, दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दुरावा वाढतानाच दिसत आहे. अशात आता ठाकरे एकाकी पडताना दिसत आहे. कारण, शिंदे गटासोबत आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. भाजपच्या नेत्यांकडून शिंदे गटासाठी बॅटींग करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भावकी असलेले ठाकरे देखील आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे राहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भेटीचं कारण गुलदस्त्यात
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिंदे गटाची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांचे वाभाडे काढले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस देखील राज यांच्या भेटीला गेले होते. अशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. यावेळी स्मिता ठाकरे यांच्यासोबत वेलनेस अंबेसिडर रेखा चौधरी आणि नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.