आज दि.४ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सिक्किममध्ये हिमस्खलनामुळे हाहाकार, 6 जणांचा मृत्यू, 80 पर्यटक दबले

सिक्किममध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिमस्खलन हे 14 मील जवाहरलाल नेहरू रोड परिसरात झालं आहे. यावेळी मोठ्या सख्यानं पर्यटक उपस्थितीत होते. या दुर्घटनेत घटनास्थळी 70 ते 80 पर्यटक अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12.20 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, भारतीय जवान आणि पर्यटन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू आहे.

आयपीएल सुरु होताच आरसीबीला धक्का! स्टार फलंदाज IPL मधून बाहेर

आयपीएल 2023 मध्ये दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. परंतु आयपीएलच्या 16 व्या सीजनला सुरुवात होताच आरसीबी संघाला एक मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज रजत पाटीदार हा दुखापतीच्या कारणामुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

आरसीबी संघाने रविवारी त्यांच्या होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसच्या झुंजार खेळीने आरसीबीला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला. आरसीबीचा दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर रंगणार असून या सामन्यापूर्वी आयसीबीने रजत पाटीदारबाबत घोषणा केली आहे.

श्री संत बाळूमामा ट्रस्टचा वाद चिघळणार; सरपंचांनी थेट कर्नाटकात जाऊन घेतला मोठा निर्णय

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अचानक चर्चेत आलं आहे. यासाठी कारण ठरलंय देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीचा वाद. या वादाचा परिणाम काल (सोमवार) कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील फ्री स्टाइल हाणामारीमध्ये पाहायला मिळाला. वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. कार्याध्यक्ष आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वाद चिघळण्याची शक्यता आहे. काल या प्रकरणी हाणामारी झाल्यानंतर आज एका गटाने परस्पर कार्याध्यक्षपदाची नेमणूक केली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढला आहे. यावर 6 एप्रिलला तहसीलदारांनी बैठक बोलवली आहे.

‘यापुढे फडणवीसांबाबत बोललात तर…’, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंना ‘धमकी’!

ठाण्यामध्ये महिला शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा उपमुख्यमंत्रिपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्रिपद मिरवत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘फडणवीसांबाबत बोलाल तर याद राखा, आमच्या नेत्यांवरची टीका सहन करणार नाही. याला धमकी समजा. उद्धव ठाकरे यांनी लिमीट पार केली तर आम्हालाही लिमीट पार करावी लागेल, आज उद्धव ठाकरेंनी लिमीट पार केली,’ असं बावनकुळे म्हणाले.

मेडिकलमध्ये आराम करत असतानाच हार्ट अटॅक; मृत्यू CCTV कॅमेऱ्यात कैद

कोरोनानंतर तरुणांमध्ये अचानक हार्ट हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खाजगी रुग्णालयातील औषध दुकानात काम करताना औषध विक्रेत्याला हृदयविकराचा तीव्र झटका आला. यात खुर्चीवरच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. नांदेड शहरातील डॉक्टरलेन भागात ही घटना घडली.

मुंबईकरांना 11 एक्स्ट्रा लोकलचे गिफ्ट, पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा वाचणार वेळ

पश्चिम रेल्वे बुधवार 5 एप्रिलपासून जलद मार्गांसह 11 अतिरिक्त ट्रेन्स चालवणार आहे. नवीन फास्ट गाड्या आणखी फास्ट धावतील, कारण त्या वांद्रे आणि बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. वांद्रे आणि बोरिवली ही पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत. इथे प्रत्येक फास्ट व स्लो लोकल ट्रेन थांबते; पण, या नव्या प्रयोगात ही दोन्ही महत्त्वाची स्थानकं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम उपनगरी रेल्वेंतून प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचेल, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे. या संदर्भात ‘मिड-डे’ ने वृत्त दिलंय.

21 हजार सूर्यफुलांनी सजला दगडूशेठ गणपती, बाप्पाचं मोहक रूप पाहून मन होईल प्रसन्न

चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक पुण्यातील  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला.मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर 7-8 दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती.दगडूशेठ गणपतीचे हे मनोहर रुप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

ब्रह्मास्त्रच्या पुढच्या भागाविषयी अयान मुखर्जीची मोठी घोषणा! ‘या’ वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट

‘ब्रह्मास्त्र’साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला.हा चित्रपट म्हणजे तीन भागांची मालिका असणार आहे. त्यातला पहिला भाग प्रदर्शित झाला असून आता येणाऱ्या दोन भागांची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.आता अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रच्या पुढच्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.अयान मुखर्जीने सांगितले की, ‘ब्रह्मास्त्र: भाग 1 शिवा’ ला मिळालेले प्रेम पाहून मी भाग 2 आणि भाग 3 वर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.’तसंच चांगल्या स्क्रिप्टसाठी थोडा वेळ हवा आहे हेही त्याला जाणवलं आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी होणार असल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.

“प्राप्तीकर विभागाचा ४४ हजार कोटींचा ग्राहकांवर दरोडा”, राजू शेट्टींची टीका

“देशातील ४४ कोटींहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय प्राप्तीकर विभागाने घेतलेला आहे. या प्रक्रियेसाठी दरडोई १ हजार रुपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटींचा दरोडा पडणार असून, या विरोधात आवाज उठवण्यात यावा”, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली.केंद्र सरकारने डिजिटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींना आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक पॅनकार्ड धारकास १ हजार रुपये खर्च येत आहे. याद्वारे केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रुपयांचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधारकार्ड व पॅनकार्ड असणे बंधनकारक करण्यात आलेला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.