बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक माध्यमांसमोर आले. त्यानंतर आज सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असंही फडणवीस म्हणाले.