‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्राच्या घराघरात हा कार्यक्रम फारच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओमकार भोजने यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. त्यानंतर आता या कार्यक्रमातील आणखी एक विनोदवीर ही मालिका सोडणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही मालिका सोडणार असल्याचे बोललं जात आहे. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. त्याने त्याच्या विनोदी अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र आता लवकरच ओंकार हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे. तो लवकरच झी मराठीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. त्याचा एक प्रोमोही सध्या व्हायरल होत आहे.
मनोरंजन मराठी ऑफिशिअल या इन्स्टाग्राम पेजने दिलेल्या माहितीनुसार, ओंकार भोजने हा लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्झिट घेणार आहे. त्यानंतर आता तो लवकरच फू बाई फू च्या नव्या पर्वात झळकणार आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.‘फू बाई फू’ या कार्यक्रमाला २०१० मध्ये सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. हा कार्यक्रम २०१४ मध्ये बंद झाला. त्यानंतर आता तब्बल ८ वर्षांनंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. याद्वारे प्रेक्षकांचे पोट दुखेपर्यंत मनोरंजन करताना दिसणार आहे. या कार्यक्रमात अनेक विनोदवीर एकत्र मंचावर दिसणार आहे.
दरम्यान ओंकार हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी तो चुकीचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा फार चांगला कॉमेडी शो आहे. त्यामुळे तू तो सोडू नकोस, अशी विनंतीही त्याचे चाहते करताना दिसत आहे.