तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातच ; गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारच्या हालचाली

 ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकल्प राज्यातच उभारावा, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उद्योग विभागाच्या उपसमितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तब्बल १४ महिन्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत ‘नाणार’ तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू येथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाणार येथे भूसंपादन झाले असल्याने आणि प्रकल्पासाठी हीच जागा सुयोग्य असल्याने तिथे प्रकल्प उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

‘वेदान्त- फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातला गेल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते. तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, याबाबत सरकार खबरदारी घेत आहे.नाणार येथे साडेसात हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित असला तरी काही गावांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे ही गावे वगळून साडेपाच हजार हेक्टर जमिनीवर प्रकल्प उभारण्याची सूचना काही मंत्र्यांनी केली. प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करा, लोकांशी चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करावा, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.