आज दि.२८ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना
९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मागील काही महिन्यांमध्ये अनेक बँका दिवाळखोरीत निघाल्या. पंजाब अॕण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँक, येस बँक, लक्ष्मी बँक यासारख्या अनेक बँकांचे ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पीएमसी बँकेचं प्रकरण देशभर गाजलं होतं.

१४ जिल्ह्यांमधील निर्बंध
शिथिल करण्याचा प्रस्ताव

करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये करोना सक्रिय रुग्णदर एक किंवा त्यापेक्षा कमी असेल तेथील करोना विषयक निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल, असं सांगितलं होतं. आरोग्य विभागानं निर्बंध शिथिलीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

दोन डोस घेतलेल्यांना
लोकल प्रवास करणे शक्य

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करु देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करण्यासंबंधी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मोठं विधान केलं आहे. करोनामुळे मुंबईत अजूनही काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत.

ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारी
पदकाच्या जवळ

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा ६-४ असा पराभव केला आहे. ती आता पदकाच्या जवळ पोहचली आहे.

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,
सीबीआयची बारा ठिकाणी छापेमारी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.

इंजिनीअरिंगसाठीच्या
जागांमध्ये मोठी घट

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट होऊन त्या २३.२८ लाखांवर आल्या आहेत. या वर्षामध्ये इंजिनीअरिंगसाठीच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे, तसंच इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, असं असूनही शिक्षणक्षेत्रामधल्या एकूण जागांपैकी ८० टक्के जागा या इंजिनीअरींगच्या आहेत.

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये
भारताची समजदार कामगिरी

नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धे’त भारताला १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदके मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताला ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले आहे.

लाचखोरीच्या २७४ प्रकरणांचा
तपास रखडला

गेल्या सात महिन्यांमध्ये अभियोगपूर्व मंजुरीअभावी लाचखोरीच्या २७४ प्रकरणांचा तपास रखडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. यातील सर्वाधिक २८ प्रलंबित प्रकरणे गृहविभागातील आहेत.

परमबीर सिंह यांच्या अडचणीत
वाढ होण्याची शक्यता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीत. परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील.

मुख्यमंत्री सहायता निधीला
भाजपचे आमदार करणार मदत

राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.

राज्यातील पहिले मेडिकॅब
रुग्णालय जालन्यात सुरू

राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि रेफर हॉस्पिटल म्हणून जालन्याला लागलेला डाग पुसून काढण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होईल, अशी आशा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या
तारखेत बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

राज्यातील धरणं निम्मे भरली

राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. पण या संकटात दिलासादायक बातमी म्हणजे अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्मे भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 48.41 टक्के पाणीसाठा आहे.

राज कुंद्रामुळे 100 दिवसात
महिला करोडपती

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात कानपूरमध्ये राहणाऱ्या हर्षिता श्रीवास्तव हिचं नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. हर्षिताचा पती अरविंद श्रीवास्तव हा राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनवल्या जाणाऱ्या पॉर्नोग्राफी फिल्मचं डिस्ट्रीब्यूशन करत होता. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर हर्षिताचं बँक अकाऊंट ताब्यात घेण्यात आलं. या तपासात हर्षिताच्या अकाऊंटमध्ये जवळपास अडीच कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. राज कुंद्राची कंपनी सुरू झाल्याच्या 100 दिवसातच ती करोडपती बनली.

सांगलीच्या पूरग्रस्त परिसरामध्ये
अजस्त्र मगरींचा वावर

सांगलीच्या पूरग्रस्त परिसरामध्ये मोठ्या, अजस्त्र मगरींचा वावर सहजरित्या सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सांगलीच्या कृष्णाकाठ परिसरात पूर्वीपासूनच मगरींचा वावर आहे. वाळवा, बुरली, आमणापूर, नांदरे, वसगडे, कर्नाळ, भिलवडी, तुंग, ब्रम्हणाल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. यापूर्वी पूर नसताना मगरींच्या सतत होणाऱ्या हल्ल्यात या परिसरातील अनेक नागरिकांचा बळी गेलेला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.