जगभरात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात वाघांची संख्या वाढावी आणि त्यांच्या संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी वेगवेगळ उपक्रम राबवले जातात. सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वाघाची (Tiger) प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत International Tiger Day सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने व्याघ्र संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.
यानिमित्ताने सोशल मीडिया आणि अन्य व्यासपीठांवरुन अनेकांकडून मजेशीर प्रश्नही उपस्थित केले जातात. भारतात वाघ घरात पाळता येऊ शकतो का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. त्यादृष्टीने कायदेशीर बाबींकडे नजर टाकल्यास काही रंजक गोष्टी समोर येतात.
भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघ पाळण्यासाठी कायदेशीर मंजुरी दिली जात नाही. या कायद्यातंर्गत तुम्ही कोणताही जंगली प्राणी घरात ठेवू शकत नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही वाघ पाळायचा ठरवलाच तर तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील मुख्य वन्यजीव संरक्षकांकडून परवानगी घ्यावी लागेल.
यासाठीही एक पूर्वअट आहे. तुम्हाला वाघाचा लहान बछडा कुठे आढळला असेल, तुम्ही बरेच दिवस त्याचा सांभाळ केला असेल आणि तुम्ही पुढेही त्याचा सांभाळ करू इच्छित असाल तर तुम्ही परवानगीसाठी अर्ज करु शकता.
अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला वाघ सांभाळायची परवानगी मिळालीच तरी त्यासाठी तुम्हाला वाघाच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्याच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करणे बंधनकारक असेल. उद्या एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल. भूकंप झाला किंवा वाघ घरातून पळून गेला, त्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा जीव घेतला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तसेच तुम्हाला वाघ का पाळायचा आहे, याचे सबळ कारण तुम्हाला सांगता आले पाहिजे. अन्यथा तुमची मागणी वनखात्याकडून फेटाळली जाईल.
2015 साली मध्य प्रदेशातील तत्कालीन पशुपालनमंत्री कुसुम मेहडेल यांनी वनखात्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये नागरिकांना वाघ घरी पाळण्याची परवानगी मिळावी, असे म्हटले होते. यामुळे व्याघ्र संवर्धनाला चालना मिळेल, असा दावा कुसुम मेहडेल यांनी केला होता.
थायलंडसह अनेक आशियाई देशांमध्ये वाघ पाळण्यास कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे या देशांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे कुसुम मेहडेल यांनी म्हटले होते.
जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये वाघांची संख्या 20 हजार ते 40 हजार इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या सातत्याने घटत गेली