गेल्या काही दिवसापासून आसाम आणि मिझोराममध्ये वाद सुरु आहे. या वादाचं रुपांतर धुमश्चक्रीत झालं. दोन्ही बाजूने दगडफेक आणि गोळीबार झाल्याने, आसामचे तब्बल 6 पोलीस शहीद झाले तर अनेक जण जखमी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील धडाकेबाज अधिकारी आणि सध्या आसाममध्ये कचार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणारे वैभव निंबाळकर यांचा समावेश आहे.
25 व्या वर्षी IPS, कोण आहेत वैभव निंबाळकर?
वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर गावचे आहेत. 2009 च्या IPS बॅचचे अधिकारी असलेले वैभव निंबाळकर सध्या कचार जिल्ह्याचे एसपी आहेत. आसाममधील हिंसाचारामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आहे.
वैभव यांचं प्राथमिक शिक्षण बारामतीत झालं. दहावीला ते पुण्यात आले. गावाकडून आलेला लाजराबुजरा पोरगा अशी वैभव यांची ओळख होती.
वैभव निंबाळकर हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यावेळी पंचक्रोशीत जल्लोष झाला होता. पदवीच्या पहिल्या वर्षापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ते वर्ष होतं 2007. वैभव यांनी 2009 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवेत अर्थात IPS प्रवेश मिळाला आणि आसाम हे केडर मिळालं. त्याआधी ऑगस्टमध्ये मसुरीला त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं.
आसाम हे नेहमीच धगधगत असणारं राज्य. त्यामुळे तणावग्रस्त या राज्यात ड्युटी करण्याऐवजी केडर बदलून घेण्याची इच्छा एखाद्याच्या मनात येऊ शकत होती. मात्र वैभव यांनी याच राज्यात काम करण्याचं ठरवलं होतं.
वैभव हे परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यावेळी त्यांचे वडील न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीत कामाला होते. तर आई गृहिणी आणि बहीण उर्मिला ही हिंदी-मराठी मालिकांमध्ये छोटे मोठे अभिनय करत होती.
वैभव निंबाळकर यांना लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे IPS झाल्याने त्यांना स्वत:चा आनंद गगनात मावेनासा झाला. वैभव यांना 12 वीला चांगले गुण मिळाले होते. त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. मात्र ते सोडून त्यांनी Bsc ला प्रवेश घेऊन यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 204 वा नंबर मिळाला. या परीक्षेसाठी वैभव यांनी सोशॉलॉजी आणि मराठी साहित्य हे विषय घेतले होते. मराठी साहित्य आणि निबंध या लेखी परीक्षांमध्ये ते रँक होल्डर ठरले होते.