केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. त्यासाठी कामं करावी लागतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना नाव न घेता लगावला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. प्रतापने ऑक्सिजन प्लांटचं जे काम केलं ते खरं काम. हे खरे आशीर्वाद. या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. नुसतं बोंबलून काही आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद द्या हो… आशीर्वाद द्या हो… कशासाठी देऊ? काय नाही… असेच द्या… असे नाही आशीर्वाद मिळत. या कामातून आशीर्वाद मिळतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.
मनसे आणि भाजपने कोरोनाचे नियम मोडून दहीहंडी उत्सव साजरी केली. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोनाचे नियम मोडून आम्ही करून दाखवलं असं सांगायला हे काही स्वातंत्र्य युद्ध नाहीये. हे काही स्वातंत्र्य मिळून दाखवलं नाही. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. कोरोनाचे नियम सरकारने का घालून दिले आहेत? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. निर्बंधांना विरोध करायला फुकट कोरोना वाटप करण्याचा हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये, अशी टीका त्यांनी मनसे आणि भाजपचे नाव न घेता केली.
तिसरी लाट येऊ शकते. त्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. केंद्राने पत्रं दिलं आहे. त्यात त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवात निर्बंध पाळा असं म्हटलं आहे. त्यामुळे कोणतंही सरकार कोणत्याही सणांविरोधात नाहीये. आपण कोरोना विरोधात आहोत. त्यामुळे आंदोलन करण्याची ज्यांना खुमखुमी आहे. त्यांनी कोरोनाविरोधात आंदोलन करावं. प्रतापने जे आंदोलन केलं ते कोरोनाविरोधातील आंदोलन आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात आंदोलन करण्याची यांची हिंमत नाही, कुवत नाही. विचार नाही आणि तेवढी प्रगल्भताही नाही. त्यांना रस्त्यावर उतरून गोंधळ घालायचा आहे. आणि शिस्त पाळणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालायचा आहे.