महाराष्ट्र सरकारनं येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या (Omicron )पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं (BMC ) पहिली ते चौथीचे वर्ग सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, महापालिकेत झालेल्या बैठकीनुसार पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार नाहीत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते चौथीचे वर्गा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, ओमिक्रॉन विषाणूमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवार मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीनं पहिली ते चौथीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. तर, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय येत्या दहा ते बारा दिवसांमध्ये घेतला जाईल, अशी माहिती देखील शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.