आमदार बनसोडे गोळीबार प्रकरणी गुन्हे दाखल

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह 8 ते 9 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार याच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काल (बुधवार 12 मे) गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना काल दुपारी दीडच्या सुमारास घडली होती.

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लाव म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.