जन्म २३ एप्रिल १९६९ नरकटियागंज, बिहार येथे
मनोज बाजपेयीने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोज यांना डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. मनोज यांचे नाव अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, कदाचित त्यामागेही नियतीच असावी. आज मनोज वाजपेयी बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो, मनोज बाजपेयी हे प्रयोगकर्मी अभिनेता म्हणून ओळखले जातात. मनोज बाजपेयी यांनी प्रारंभिक शिक्षण के.आर. हायस्कूल मधून घेतल्यावर ते दिल्लीला गेले. तेथील रामजस कॉलेज मधून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुढे त्यांनी एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ड्रामामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला मनोज यांना एकदा नव्हे तर तीन वेळा नाकारण्यात आला. यामुळे ते खचले होते. नसीरूद्दीन शहा, ओम पुरीसारखे दिग्गज स्टार एनएसडीतून घडले. त्यामुळेच एनएसडीत प्रवेश हे मनोज यांचे स्वप्न होते. त्याने या स्वप्नाचा पिच्छा पुरवत चौथ्यांदा प्रवेशासाठी अर्ज केला. पण याहीवेळी त्याला नकार मिळाला. याच दरम्यान रघुवीर यादव यांनी त्याला ऍक्टिंग वर्कशॉप करण्याचा सल्ला दिला.
मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअरची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. सत्य या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार मिळाला होता. अमृता प्रीतम यांची गाजलेली कादंबरी ‘पिंजर’वर आधारित ‘पिंजर’ याच नावाचा चित्रपट त्यांनी केला या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आपल्या अभिनय कारकीर्दीत त्यांनी आतापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. मनोज बाजपेयी यांना बहुतेक वेळा चरित्र भूमिका मिळालेल्या आहेत. मनोज बाजपेयी हे हिंदी चित्रपटाबरोबर तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये व वेब सिरीज मध्ये ही कार्यरत आहेत. नुकताच ‘भोसले’ चित्रपटासाठी मनोज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेच्या एका चित्रपट संस्थेने अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ला महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून घोषित केले होते. नीरज पांडे यांनी नुकतीच ‘सीक्रेट्स ऑफ सनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ ही डॉक्युमेंट्री डिस्कव्हरी + वर रिलीज केली. ज्यात सुत्रधार म्हणून मनोज वाजपेयी यांनी काम केलं आहे. २०१९ मध्ये भारत सरकारने मनोज बाजपेयी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे.
मनोज बाजपेयी यांनी २००६ साली शबाना रझा हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर शबाना यांनी आपलं नाव बदलून नेहा रझा बाजपेयी असं केलं. तिने करीब, होगी प्यार कि जीत, मुस्कान, कोई मेरे दिल में हे, फिझा यांसारखे चित्रपट केले. काही चित्रपटात तिने प्रमुख भूमिका केल्या तर काही चित्रपटात तिने सहायिकेची भूमिका बजावली. मनोज बाजपेयी आणि नेहा रझा बाजपेयी याना अवा नईला नावाची मुलगी आहे.
मनोज बाजपेयी यांचे काही चित्रपट. दस्तक, संशोधन, तपन्ना, शूल, पिंजर, वीर-जारा, 1971, गैंग्स ऑफ वासेपुर, स्पेशल 26, अलीगढ, नाम शबाना,सात उचक्के, अय्यारी, ट्रैफिक, तेवर, राजनीति, सूरज पे मंगल भारी.
संजीव वेलणकर, पुणे