TET परीक्षा घोटाळ्याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवलं जात आहे. मला जाणूनबुजून टार्गेट केलं जात असून या सगळ्याचा मनःस्ताप होत आहे. त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, असा इशारा तुकाराम सुपे याने दिला आहे. तुकाराम सुपे हा टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त असून हा घोटाळा उघड झाल्यापासून तो तणावात असल्याची माहिती सुपे याचे वकील मिलिंद पवार यांनी बोलताना दिली.
तुकाराम सुपे याचे वकील अॅड मिलिंद पवार म्हणाले, टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणात मला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, अशा इशारा सुपे यांनी दिलाय. सुपे म्हणाले की, 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यांनाच काम दिल्या होत्या. मात्र या सगळ्यात मला बळीचा बकरा बनवलं जात आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया तुकाराम सुपे यांनी दिल्याची माहिती अॅड. मिलिंट पवार यांनी दिली. सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आरोपी करणार असल्याची पुणे पोलिसांची तयारी आहे, या पार्श्वभूमीवर त्याने ही प्रतिक्रिया दिल्याचे पवार यांनीन सांगितले.
टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर याच्य्यासह अन्य साथीदारांवर आरोप झालेले आहेत.
मुख्य आरोपी असलेल्या तुकाराम सुपे याच्या कार्यालयात तसेच परिचितांकडे टाकलेल्या धाडींमध्ये आतापर्यंत 3 कोटी 87 लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुपे याच्याकडे मिळालेल्या घबाडात सोने आणि चांदीचाही समावेश आहे. तुकाराम सुपे याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनीही या गैरव्यवहारात मदत केल्याचं समोर आलं होतं. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडूनही छापा मारून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोनं हस्तगत केलं.