बिहार मध्ये नदीत बोट उलटली, 24 शेतकरी बुडाल्याची भीती

शेतकऱ्यांनी घेऊन जाणारी बोट गंडक नदीत बुडाल्याने 24 शेतकरी बुडाल्याची दुर्दैवी घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बोटीमधील एका इसमाने दुर्घटनेनंतर नदीतून पोहत आपले प्राण वाचवले आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव इंद्रजीत सिंग असून तो खेम मटिहानी गावचा होता आणि दुसरा मृतक जादोपूरच्या बारईपट्टी गावचा रहिवासी होता. बुडालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.

सर्व शेतकरी नदी पार करुन पलिकडे असलेल्या शेतावर कामासाठी चालले होते. गंडक नदीतील बेतिया-गोपालगंज सीमेवर भगवानपूर गावाजवळ बोट येताच बुडू लागली. बोट ओव्हरलोड असल्याने नदीच्या जोरदार प्रवाहात बोटीचा दबाव न टिकल्याने बेतियाच्या नौतान भागात हा अपघात झाल्याची माहिती मिळते. बुडालेल्यांमध्ये कुटायकोट आणि विशंभरपूर ठाणे परिसरातील अनेक शेतकरी होते.

बोटीत ट्रॅक्टर ट्रॉलीही लोड करण्यात आली होती. या ट्रॅक्टर आणि बोटीवर सुमारे 25 जण बसले होते. बेतियाच्या भगवानपूर गावाजवळील नदीत बोट पोहोचताच ओव्हरलोड असलेली बोट बुडाली. यातील दोन मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर अन्य तिघांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशंभरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेशकुमार यादव आणि इतर पोलीस अधिकारी यांच्या निगराणीखाली घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.