कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरच रुग्णालयांबरोबरच मेडिकल स्टोअर्समध्येही कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे. तज्ज्ञांच्या विशेष समितीची आज(बुधवारी) महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या लसी खुल्या बाजारात विकण्यास आपली मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताचा कोरोना लढा आणखी भक्कम होणार आहे.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या नियमित विक्री करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील. सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे.
कोरोना लसींच्या नियमित मार्केटिंगसाठी मान्यता मिळवण्याच्या हेतूने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केले होते. त्यांच्या अर्जाची दखल घेताना तज्ज्ञांच्या विशेष समितीने लसींच्या चाचणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे. समितीने केलेल्या शिफारसीला अनुसरून आता सरकारकडून औपचारिक अंतिम मंजुरीची घोषणा केली जाण्याची प्रतीक्षा आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंह यांनी 25 ऑक्टोबरला डीसीजीआयकडे यासंदर्भात अर्ज सादर केला होता. डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूटकडून अधिक डाटा आणि कागदपत्रे मागितली होती, त्यावर सिंह यांनी नुकतीच कोव्हीशील्ड लसीची अधिक माहिती सरकारकडे सादर केली होती.
त्याचबरोबर हैदराबादच्या भारत बायोटेकनेही डीसीजीआयच्या सूचनेनुसार कोवॅक्सिन लसीची अधिक माहिती तसेच लसीच्या चाचणीसंबंधी कागदपत्रे सादर केली होती. त्याची दखल घेऊन तज्ज्ञांच्या समितीने लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास आपली मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या मंजुरीनुसार सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना देशभरात आपली वितरण व्यवस्था तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर या कंपन्या आपल्या लसी सर्व रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.