राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम आयोजित केला होता. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 44 शाळांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात प्रथम आलेल्या दोन शाळांचा मंत्रालयात सन्मान करण्यात आला तर उर्वरीत शाळांना सोलापूरच्या जिल्हा परिषदेत सन्मानित करण्यात आले.
आजच बोर्डाने बारावीच्या परीक्षांबाबत आणि हॉलतिकीटबाबत मोठी अपडेट दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळा शनिवार रविवार सुरू राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोलापुरातला हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने पार पडला. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेला स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे. त्यामुळे स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे. त्याचबरोबर तो विभागातही राबवायला हवा अशी अपेक्षाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली. दरम्यान ऑनलाईन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला पण प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाईनमध्ये येत नाही हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे शाळा ऑफलाईन पध्दतीनेच भरवण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला.
संकटावर मात करुन नवीन काहीतरी केले पाहिजे. सोलापूर झेडपी सीईओंनी ते प्रत्यक्षात करुन दाखवले. राज्याला अभिमान वाटेल असे कार्य सोलापूर जिल्हा परिषदेने केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने संकटाचे संधीत रुपांतर केले आहे. राज्य शासनाच्या निधीची वाट न पाहता हा उपक्रम राबवला हे विशेष आहे. त्याचबरोबर या उपक्रमाचे सातत्य टिकवले पाहिजे, राज्य सरकार आपल्याला योग्य ती मदत देईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
हा उपक्रम पाहून मला आर आर पाटील यांची आठवण येत आहे. त्यांनी राज्यभरात गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले होते. त्याद्वारे गावंच्या गावे स्वच्छ झाली आणि नागरिकांचे आरोग्यमान उंचावले होते. दरम्यान राज्याने राबविलेले कार्यक्रम देशाने उचलले आणि आज ते केंद्र सरकार राबवत आहे.