फिल्म निर्मात्याने आदित्य पांचोली विरोधात शिवीगाळ करणे, धमकावणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदित्य पांचोलीने दारुच्या नशेत असे कृत्य केल्याचे निर्मात्याने सांगितले. सॅम फर्नांडिस असे या चित्रपटाच्या निर्मात्याचे नाव आहे. चित्रपट निर्मितीवरुन आदित्य पांचोली आणि सॅम फर्नांडिस यांच्यात वाद झाला. याच वादातून दारुच्या नशेत असलेल्या आदित्य पांचोलीने शिवीगाळ आणि मारहाण केली.
सॅम फर्नांडिस यांना आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला घेऊन एक चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटासाठी सॅम फर्नांडिस यांनी 2 कोटी रुपये गुंतवले होते तर आदित्य पांचोलीनेही 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र हा चित्रपट केवळ अडीच कोटीत बनणार नव्हता. त्यासाठी 60-70 कोटी फायनान्सची आवश्यकता आहे. यासाठी निर्माता सॅम फर्नांडिसला कुणीही फायनान्सर मिळत नव्हता.
कुणीही या चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी तयार नव्हता. ही बाब फर्नांडिसने आदित्यला सांगितली. त्यानंतर 27 जानेवारी रोजी आदित्य पांचोलीने चित्रपट निर्माता सॅमला जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.
याचदरम्यान आदित्य पांचोलीने सॅमला धमकी दिली की, तुला माझ्या मुलासोबत चित्रपट बनवावा लागेल, नाहीतर मी तुला संपवून टाकेन. तसेच शिवीगाळ आणि मारहाणही केली.याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात आदित्य पांचोली आणि निर्माता सॅम फर्नांडिस यांच्या विरोधात परस्पर क्रॉस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून क्रॉस एनसी नोंदवून तपास सुरू आहे, असे डीसीपी मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले. याबाबत आदित्य पांचोली याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.