विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही, मला जबाबदारीतून मुक्त करा अन्.. अजितदादांच्या मागणीने खळबळ
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. पवारांचा राजीनामा ते पक्षाला दोन नवीन कार्याध्यक्ष. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी जाहीर मागणीच पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात केली आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात; एस्कॉर्ट व्हॅनसह ‘मातोश्री’वरील सुरक्षाही कमी
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत मुंबईतून मोठी बातमी आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे.अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्ंयामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली.
कुपोषण निर्मुलन ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी डॉ. दीपक सावंत
राज्यात कुपोषणाला आळा घालण्यासाठी, तसेच बालमृत्यू, मातामृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून या ‘टास्क फोर्स’मध्ये महिला बाल विकास, आरोग्य, आदिवासी, कृषी, अन्न व नागरी पुरवठा विभागांचे अप्पर सचिव, सचिव, प्रधान सचिव, आयुक्त यांचा समावेश आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या राज्याच्या कुपोषण निर्मुलनातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मुलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला विदर्भ दौरा करण्याचे पक्के केले आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना गतवर्षी निमंत्रण मिळाले होते. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने हे निमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार केल्याचे पत्र अखेर पोहोचले.आज एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्या अनुषंगाने बैठक झाली. त्यात राष्ट्रपतींच्या संभाव्य आगमनाबाबत चर्चा झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. हिंदी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यास उपस्थिती व भव्य सभागृहाचे लोकार्पण असे कार्यक्रम होतील. व त्यानंतर सेवाग्राम आश्रम भेट असे तीन कार्यक्रम सहा जुलैला होणार आहे.
हवामान खात्याचा दिलासा ! मुंबईत बरसणार पण..
हवामान खात्याने मुंबईकरांना गोड दिलासा दिला असून उद्या, २२ जूनला मुंबईत मध्यम तर २३ व २४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या खात्याच्या अंदाजावर आता समाजमाध्यमांवरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.जून महिन्याचा उत्तरार्ध आला तरी मान्सून दडी मारून बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मात्र, येत्या चार दिवसांत वातावरणात बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले असून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम असल्या तरीही २३-२४ जूननंतर विदर्भालादेखील उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. येथेही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ जूनला कोकणात मूसळधार पावसाची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने बळकावलेल्या कार्यालय इमारतीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या २४ वर्षापासून ताबा घेतलेल्या इमारतीचा ताबा परत द्यावा या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये कॉंग्रेसने बुधवारी ठिय्या आंदोलन केले. चार दिवसांत या बाबतीत राष्ट्रवादीने निर्णय घेतला नाही तर मुंबईत खा. शरद पवार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसू असा इशारा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जिंतेंद्र पाटील यांनी दिला.
वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत विमा संरक्षण मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत शेकडो किलोमीटर अंतर पार करून पंढरपूरला जातात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो. या सर्व वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने विमा संरक्षण दिलं आहे.पंढरपूरच्या या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.
झिनत अमान ते गावसकर, सगळ्यांनी विरोध केलेलं पशुधन विधेयक सरकारकडून मागे
मोदी सरकारने आणलेल्या पशुधन विधेयकाला जोरदार विरोध झाला आणि यानंतर अखेर सरकारने हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला. या विधेयकात कुत्रे, मांजरांसह प्राण्यांच्या निर्यातीला परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच विधेयकाचा मसुदा मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या.मोदी सरकारच्या या विधेयकात केवळ गाय, बैल, म्हशी यांचीच नाही, तर अगदी कुत्रे, मांजर यांच्याही निर्यातीची तरतूद करण्यात आली होती. यानंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावसकर, अभिनेत्री झिनत अमान, किटू गिडवानी आणि आचर्या लोकेश मुनी यांच्यासारख्या दिग्गजांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. या पशुधन विधेयकाच्या विरोधात सोशल मीडियावर ‘से नो टू लाईव्हस्टॉक बिल २०२३’ असा हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला.
लोकांचा विद्यमान भाजपा सरकारवरचा विश्वास उडाला; भाजपा आमदारांनी दिल्लीत जाऊन व्यक्त केली खंत!
मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार बहुमतात आहे. दीड महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार रोखण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर मैतेई समाजाचे नऊ आमदार त्यातही भाजपाचे आठ आणि मणिपूर सरकारला पाठिंबा देणार्या एका अपक्ष आमदाराने पंतप्रधान कार्यालयाला भेट देऊन “सामान्य जनतेचा विद्यमान भाजपा सरकारवरील विश्वास उडाला असल्याचे” निवेदन सोमवारी (१९ जून) सादर केले. पंतप्रधान कार्यालयाला निवेदन देत असताना त्याच दिवशी राज्यातील इतर ३० आमदारांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या तीस आमदारांमध्ये एनपीपी आणि जेडीयू पक्षाचा प्रत्येकी एक आमदार होता. या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळाबाबत बोलताना निशिकांत सिंह सपम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, भाजपामध्ये कोणतेही गटतट नसून आमचा पक्ष एकसंध आहे. विसंवाद झाल्यामुळे दोन वेगवेगळी शिष्टमंडळे आली.
ICC आणि BCCIने मिळून पाकिस्तानच्या मागण्यांना दाखवली केराची टोपली, वर्ल्डकपबाबत आले मोठे अपडेट्स
क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हटला जाणारा एकदिवसीय विश्वचषक सुरू व्हायला फक्त चार महिने बाकी आहेत. ही स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद बीसीसीआय भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच विश्वचषकाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोठा झटका बसला आहे. पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयकडे मागणी केली होती ती मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.वास्तविक, पाकिस्तानने आयसीसी आणि बीसीसीआयकडे मागणी केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये सामना खेळायचा आहे. त्यानंतर लगेचच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी बोर्डाने दोन्ही स्थळांची अदलाबदल करण्याची मागणी केली होती.
SD Social Media
9850 60 3590