आज दि.८ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

काँग्रेस जर नसती तर, देशात
जातीयवाद राहिला नसता : पंतप्रधान

स्वातंत्र्य मिळत असतांना काँग्रेस विसर्जित करा असं महात्मा गांधी म्हणाले होते. हे जर झालं असतं तर देशात काय झालं असतं हे सांगत काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा मोदी यांनी भाषणात वाचला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मिर सोडावं लागलं नसतं. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती”, अशी टीका मोदी यांनी केली.

कामगारांच्या स्थलांतरावरून
काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच करोना काळातील लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत कामगारांवर “मेरे लिए चले थे क्या..” या वक्तव्याचा आधार घेत सुरजेवाला यांनी मोदींना लक्ष्य केलं. रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले, “गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आणि ‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोना आला. राजाने घोषणा केली आणि गरीब-कामगारांना संकटात अडकवलं. मंत्र्यांनी टीव्ही पाहण्यात, अंताक्षरी खेळण्यात समाधान मानलं.

कर्नाटकातील हिजाब
बंदी वाद चिघळला

कर्नाटकातील हिजाब बंदीच्या वादात आता शिमोगा येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी वर भगवा झेंडा फडकावत आहे, तर बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत आहेत. तेथे जमलेले बहुतांश विद्यार्थी भगवे झेंडे आणि उपरणे फडकावत होते.

राज्यात पुन्हा
थंडी अवतरणार

राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे.

गरीब कुटुंबातील विद्यार्थी होणार
डॉक्टर, पहल संस्थेचा उपक्रम

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांनी वर्ग ११ व १२ वी च्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘पहल’ उपक्रम सुरू करून मोफत ‘नीट’ चे प्रशिक्षण देण्यात येते होते. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असून ‘नीट’ च्या निकालात ‘पहल’ चे सहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तीन विद्यार्थ्यांना सेवाग्राम, चंद्रपूर व अंबेजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर दोघांना पशुवैद्यकीय तर, एकाला डी.फार्ममध्ये प्रवेश मिळाला आहे. ‘नीट’ परीक्षेची शिकवणी लावू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नीटच्या तयारीसाठी ‘पहल- रास्ता उम्मीद का’ या नावाने उपक्रम सुरू केला.

लाच घेताना पकडले तरी देखील
महिला अधिकारी हसत होत्या

राजस्थानमध्ये लाचखोरीचं एक प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण कार्यालयच लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर राज्य प्रशासनिक सेवा अधिकाऱ्याने जेव्हा मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आलं असेल तर नाही कसं म्हणणार असं अजब उत्तरही दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त यांच्यासहित संपूर्ण कार्यालय लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यात आलं. लाच घेताना पकडल्यानंतर राज्य प्रशासकीय सेवेच्या अधिकारी ममता यादव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हसत होत्या.

महाराष्ट्रात ओबीसींची संख्या
३८ टक्क्यांपेक्षा जास्त

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ३८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यास कुठलीही हरकत नाही असं सांगितलं आहे. या अहवालाचा आधार घेत महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसे पत्र निवडणूक आयोगाला पाठविल्याचंही ते म्हणाले.

मुंबई -गोवा महामार्गावर
परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. याचा परिमाण वाहतुकीवर झाला आहे. या मार्गावरील मोठी माती आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड बाजुला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि क्रेन दाखल झाल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळली.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.