मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईलेनवर एका लक्झरी बसवर अज्ञात इसमानी दगडफेक केली. या विचित्र घटनेत बसचं मोठं नुकसान झालं आहे. तर बसमधील प्रवासी भयभीत झाले. या दगडफेकीत काही प्रवाशांना दुखापतही झाली आहे. या घटनेनंतर बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात या वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यानंतर लगेचच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलीस सध्या याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खासगी बसवर दगडफेक केली आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दगडफेकीत या लक्झरी बसच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरील काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बसची समोरची काच आणि खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. यावरुनच अंदाज लावता येईल की ही दगडफेक किती भयानक होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस सध्या याबाबत तपास करत असून योग्य ती कारवाई करण्यात येईल.