आज दि.9 आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते वादग्रस्त वक्तव्य, चंद्रकांत खैरे अडचणीत, गुन्हा दाखल होणार?

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, तसंच ठाकरे आणि शिंदे यांना शिवसेना या नावाचाही वापर करता येणार नाही. दोन्ही गटांना नवीन चिन्हासाठी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे दाखल करायचे आहेत. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाला वेगळ्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार हे निश्चित झालं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. खैरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना उलटं टांगलं असतं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते.

नरेंद्र मोदींच्या नाण्यावर ठाकरेंचा हल्ला, फडणवीसांनी इतिहासच काढला!

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने केलेली ही कारवाई उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीनंतर घासलेलं नाणं आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नोटबंदीनंतर मोदींच्याच नाण्यावर त्यांचे आमदार-खासदार निवडून आले आहेत, हे बहुतेक उद्धव ठाकरे विसरले आहेत. मोदींचं नाणं खणखणीत आहे आणि ते कायम राहिल,’ असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

नागपूरकरांनो दिवाळीसाठी घरात चिवडा करूच नका, विष्णू मनोहरांनी करून ठेवलीये सोय

नुकताच दसरा झाला. यानंतर आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वात आधी फराळ आठवतो. लाडू, चिवडा आणि बरंच काही. यात आता नागपूरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये सर्वांना मोफत चिवडा वाटला जाणार आहे.जागतिक अन्न दिनानिमित्त नागपूरमध्ये एकाच कढईमध्ये एकाचवेळी 6 हजार किलो चिवडा तयार केला जाणार आहे. तसेच हा चिवडा फ्रीमध्ये सर्वांना वाटला जाणार आहे. कदाचित देशातील याप्रकारचे असे हे पहिलेच आयोजन आहे. 16 ऑक्टोबरला हे आयोजन होणार आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त एका कढईत एकूण ६ हजार किलो चिवडा तयार केला जाणार आहे. याठिकाणी चिवडा बनवण्यापूर्वी सुमारे दीडशे ते अडीचशे लोक तयारीला जमणार आहेत.

चंद्रपुरात 12 फुट लांब अजगर पकडण्यात यश, गिळल्या तब्बल 9 बकऱ्या

चंद्रपूर जिल्ह्यात अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशनला मोठे यश आले आहे. याठिकाणी तब्बल 12 फुट लांब अजगर पकडण्यात यश आले आहे. मागील एका वर्षापासून या अजगराची भिती संपूर्ण परिसराला होती. या अजगराने आतापर्यंत 9 बकऱ्यांना गिळून टाकले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी एकाच परिवारातील चार बकऱ्यांना गिळले आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहाचे 40 टक्के काम पूर्ण

प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येतील राम लल्लाच्या जन्मस्थानी राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. रामललाच्या गर्भगृहाच्या बांधकामाचे 40 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या बांधकामात सात पृष्ठभागांमध्ये एकामागून एक कोरीव दगड ठेवण्यात आले आहेत. मंदिर उभारणीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, दगडांनी बांधल्या जाणाऱ्या मंदिराचे संपूर्ण काम एकाच वेळी केले जात आहे.

2024 च्या आधी अमेरिकेसारखे रस्ते होणार, नितीन गडकरींचे प्रतिपादन

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी 81 व्या इंडियन रोड काँग्रेसला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 2024 पूर्वी उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे असतील. यासोबतच त्यांनी राज्यासाठी 8 हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा केली.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी मला नेहमी आठवतात. जेव्हा ते म्हणाले की अमेरिकेचे रस्ते यासाठी चांगले नाहीत कारण अमेरिका श्रीमंत आहे. तर चांगल्या रस्त्यांमुळे अमेरिका श्रीमंत आहे. मी योगीजींना वचन दिले होते की, 2024 पर्यंत उत्तरप्रदेशमधील रस्ते अमेकिरेसारखी होतील. तसेच समृद्धी ही रस्त्यांमुळेच येते. मात्र, त्यासाठी पूर्ण सहकार्य आवश्यक असेल. खर्च कमी करताना गुणवत्तेवर भर द्यावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.”

सर्पाच्या दंशानंतरही मुलाला जिवंत करण्याचा दावा; 3 दिवसांपर्यंत मृतदेहावर करीत राहिला अघोरी प्रकार

देशात आजही अनेक ठिकाणी अंधविश्वासाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. इतकच नाही तर ढोंगी लोकांना जिवंत करण्याचाही दावा केला जातो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून समोर आली आहे.

येथे सापाच्या दंशामुळे एका मुलाचा मृत्यू झाला. मात्र पुन्हा जिवंत करण्याचा दावा करून गारूड्याने तीन दिवसांपर्यंत मुलाचा मृतदेह स्वत:जवळ ठेवला. जावेदचं मटणाचं दुकान आहे. त्याचा 10 वर्षीय मुलगा मोहम्मद शादला सोमवारी रात्री विषारी सापाने दंश केला होता. मंगळवारी सकाळपर्यंत मुलाची प्रकृती ढासळली. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. येथे मुलाचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, आता 1 हजारांहून अधिक लोकांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करता येणार

युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त ग्रुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहे. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे.व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo ने ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे. यापूर्वी, बीटा वापरकर्त्यांसाठी कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअर करण्याचे फीचर दिले होते.

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गंभीर, मेंदाता हॉस्पिटलने दिली महत्त्वाची माहिती

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर काही दिवसांपासून मेदांता रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मेदांता हॉस्पिटलने मुलायम सिंह यादव यांच्यांसदर्भातील हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केले आहे.

आदित्य ठाकरेंचं स्वप्न दिल्लीत पूर्ण; 24 तास जागी राहणार राजधानी

राजधानी दिल्लीत आता ३०० पेक्षा जास्त आस्थापाने २४ तासा सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंटपासून मेडिकल दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ ते ऑनलाइन डिलीवरी सेवांचा समावेश आहे. या श्रेणीत येणाऱ्या दुकांनाना २४ तास सुरू ठेवण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढील आठव़ड्यापासून त्यांना २४ तास दुकान सुरू ठेण्याची परवानगी दिली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत २७ जानेवारीपासून नाईट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती.

क्रिमियाला रशियाशी जोडणाऱ्या पुलाचे स्फोटामध्ये मोठे नुकसान

रशियाव्याप्त क्रिमियाला रशियाशी जोडणाऱ्या एक महत्त्वाच्या पुलाचे शनिवारी एका ट्रकमधील बॉम्बच्या स्फोटात मोठे नुकसान झाले. या स्फोटाने या पुलाचा महत्त्वाचा भाग कोसळला. त्यामुळे दक्षिण युक्रेनमध्ये रसद पुरवण्यासाठीचा रशियाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. क्रिमियातील रशिया समर्थक पार्लमेंटच्या अध्यक्षांनी या स्फोटामागे युक्रेन असल्याचा आरोप केला आहे. मात्र, रशियाने याबाबत युक्रेनवर आरोप केलेला नाही.

रीझा हेंड्रिक्सच्या अफलातून खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे ठेवले आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळत आहे. महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका २७८ धावांपर्यंत मजल मारू शकली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.