मनसेप्रमुख राज ठाकरे यांची रविवारी 22 मे ला सकाळी पुण्यात सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील, असं समजतंय. यानिमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणाराय.
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेचा हा टिझर. राज ठाकरेंच्या भात्यात आणखी काय आहे? पुढचा बाण ते कुणावर सोडणार? याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
आतापर्यंत मुंबईतील शिवाजी पार्क, ठाणे आणि औरंगाबाद अशा तीन जाहीर सभा राज ठाकरेंनी घेतलीय… रविवारी चौथी सभा पुण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंचात होणाराय.
पुण्यातल्या सभेतही हिंदुत्वावरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.. अर्थात त्यांचा निशाणा असतील ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. बीकेसीत झालेल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ‘भगवी शाल पांघरून फिरणारा मुन्नाभाई’ अशा शब्दांत राज ठाकरेंना टोला हाणला होता.
बाळासाहेब होण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतायत, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्याला राज ठाकरे पुण्यातल्या सभेत करारा जवाब देतील, अशी अपेक्षा आहे.
शिवाय मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्याच्या प्रकारावरून ते उद्धव ठाकरेंना टार्गेट करतील, अशी अपेक्षा आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरूनही ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगेल, अशी अपेक्षा आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार टिंगलटवाळी करण्यात आली. त्याचाही हिशोब राज ठाकरे करतील, अशी चर्चा आहे.
ठाणे आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीकेची तोफ डागली होती. पण गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी लक्षात घेतल्या तर आता राज ठाकरे आपला मोर्चा पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या दिशेनं वळवण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष आणखी तापणाराय.