आजकालची दिवाळी म्हणजे एकदम लखलखाट, सर्वत्र फटाके, आधुनिक आणि चायनामेड. पण आमच्या लहानपणाची दिवाळी काही औरच होती. आता त्यावेळची आठवण आल्यावर आश्चर्य पण वाटतं आणि हसू पण येतं. साठ सत्तरच्या दशकातील दिवाळी मला आठवते. त्यावेळी चार आण्याची लवंगी फटाक्याची लड यायची. लाल आणि हिरव्या रंगाची असायची. त्या लड मधील फटाके एक एक करुन मोकळे करायचो. लड मधील बारीक पिळचा दोरा मजबूत असायचा, त्यामुळे दोन तीन फटाक्यांच्या वाती निघून जायच्या. एवढं सर्व झाल्यावर मग फटाके फोडण्याचा कार्यक्रम असायचा. काही वेळा कधी कधी पणती विझायची, नाहीतर अगरबत्ती संपून जायची पण फटाके संपत नसत.
नंतर फुसके आणि वात निघालेले फटाके चुरगळून त्याची दारु कागदावर जमा करुन त्या कागदाला काडी लावायची, मग त्या दारुचा जो काही भडका उडायचा तो अप्रतिम असायचा. ते दृश्य आणि वास अजूनही मनाच्या कानाकोप-यात साठवलेला आहे. माझे लहानपणाचे सवंगड्यासह रस्त्याच्या मध्यभागी फक्त कागद ठेवून तो पेटवायचो आणि दोन्ही बाजूकडून रहदारी रोखून हा कार्यक्रम व्हायचा.पाच ते दहा मिनीटांपर्यंत लोक थांबून रहायची, आणि आम्हाला त्यावेळी आनंद व्हायचा कारण नुसता कागद पेटवायचा त्यात फटाका नसायचा.
जुन्या मठात सुतळी बॉम्ब लावायचो
सर्व सवंगडी मिळून लोकांच्या घराच्या धाब्यावरील (छतावरील) पाण्याचे जुने माठ रात्री गुपचूप आणायचो आणि माठाखाली सुतळी बाॕम्ब लावायचो. रस्त्यावर एकदम शांतता व्हायची. बाॕम्ब फुटल्यावर माठाच्या खाप-या उंच उंच उडायच्या. तसेच आमच्या मनातील आनंद सुद्धा उंच उंच उडायचा.
टिकली फोडायचं नट बोल्टच्या साह्याने
फटाक्याची लड, नंतर लक्ष्मी बाॕम्ब. हे झाल्यावर मग वेळ यायची ती दहा पैशाच्या टिकलीच्या डबीवर. एका रुपयात दहा डब्या असायच्या. एकएक टिकली सांडशी किंवा पकडमध्ये धरुन फोडायची मजा काही औरच असायची. पकड नसेल तर जुने पुराने नटबोल्ट मोठ्या स्क्रुवर लावून त्याच्या मध्ये टिकली ठेवून वर आभाळाकडे फेकायचो.खाली जमिनीवर आदळल्यावर टिकली फुटायची. किंवा दगडावर एकएक करुन फोडायचो. तो आनंद मात्र आभाळा एवढा मिळायचा.
फटाक्यांचा आनंद औरच
त्यावेळी आमने सामने असा फटाक्याचा एक प्रकार होता.दोन बत्तीच्या खांबांना (इलेक्ट्रिक पोल) दोरा बांधून दो-यामध्ये आमनेसामने फटाका अडकवून तो एकाबाजूने पेटवायचा. एका क्षणात तो फटाका पेटल्यावर एका खांबावर आदळून दूस-या खांबावर आदळल्यावर जोरात फुटायचा. नागगोळीचा प्रकार तर विचारुच नका. विषारी वास जरी असला तरी लावायची फार हौस असायची, लहान चिडीचा असाच एक प्रकार होता. म्हणजे एक इंचाची पत्र्याची लहान डबी, त्यात दारु ठासून ठासून भरलेली असायची व त्यावर एक वात असायची. चिडी पेटवल्यावर ती कोणत्या दिशेने अन् कोणाच्या घरात किंवा कोणाच्या कपड्यात घुसेल याचा नेम नसायचा. कालांतराने शासनाने त्यावर बंदी घातली. आपटबार हा पण एक प्रकार असायचा. बारीक पातळ कागदामध्ये वाळूमिश्रित दारु असायची.तो बार भिंतीवर किंवा जमिनीवर आपटल्यावर फुटून जोरात आवाज यायचा.त्यावरसुद्धा शासनाने बंदी घातली.
हा प्रकार झाला फटाक्यांचा. आता घरातील फराळ म्हणजे मिठाई गोडधोड पदार्थ .सर्व पदार्थ घरीच बनायचे. त्यात खमंग, खुशखुशित चिवडा,चविष्ट चकली, शंकरपाळी, लाडू, करंजी, सांजरी, बालूशाही, गोडीशेव, असे अनेक पदार्थ असायचे. त्याच प्रमाणे दिव्यांची रोषणाई, घरी रंगीत कागदांचा बनविलेला आकाशकंदील, रांगोळीनं सजलेलं अंगण . “आली माझ्या घरी ही दिवाळी” म्हणत उटणं आणि सुगंधी साबण लावून अभ्यंगस्नानाचा आनंद काही औरच असायचा. दिवाळी नंतर शेजा-यांना फराळासाठी आग्रहाने बोलवायचे.
अशाप्रकारे त्यावेळच्या दिवाळीला आताची सर कधीच येणार नाही.दिवाळी या विषयावर एक कविता आपल्या समोर सादर करीत आहे.कवीचे नाव माहित नाही.
!!दिवाळी!!
कधी काळी दिवाळीला,पणत्यांचे दिवे पेटायचे !
आनंदाने गणगोत,एकमेकांना भेटायचे!!
मातीचे दिवे जावून आता ,
विजेचा झगमगाट आला!!
आता घराघरातल्या पदार्थांना,
हाॕटेलचा घमघमाट आला !!
आता भेटीगाठी ऐवजी,
शुभेच्छांचे एसएमएस पाठवतात!
आणि घरी बसूनच सणासुदीला एकमेकांना आठवतात!!
कधी काळी दिवाळी आठवून ,हृदयी मना वाटते !
मात्र वाढता खर्च बघून,दिवाळी सजा वाटते!!
- सुरेश थोरात, धुळे