दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्वीच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
उत्पादन शुल्क नावाने अबकारी करदेखील ओळखला जातो. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो. एखाद्या वस्तूचा निर्माता किंवा उत्पादक त्याच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क वसूल करतो. विशेष म्हणजे तो ग्राहकांकडून वसूल केला जातो. उत्पादक त्याच्या उत्पादनावर आकारले जाणारे उत्पादन शुल्क त्या वस्तूवर लावलेल्या उर्वरित करात जोडून गोळा करतो. त्यानंतर तुमच्या उत्पादनावरील ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काची रक्कम सरकारला सादर केली जाते. त्यामुळे शासनाला दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.