उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत; हिंसाचारानंतर कुठे कर्फ्यू तर कुठे इंटरनेट बंद

भाजपच्या निलंबित महिला नेता नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसक निदर्शने झाली. या निदर्शनांमुळे देशातील अनेक शहरांतील अनियंत्रित परिस्थितीवर पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवलं. या हिंसक निदर्शनांमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूर हिंसाचारानंतर प्रयागराज, सहारनपूर आणि मुरादाबादमध्येही हिंसाचार पाहायला मिळाला. आता हिंसाचाराच्या ठिकाणी कारवाई सुरू झाली असून हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, सहारनपूरच्या एसएसपींनी मीडियाला सांगितलं की, दोषींवर कठोर कारवाई करणार आहे. ते म्हणाले की, आम्ही 2 आरोपींच्या बेकायदा घरांवर बुलडोझरची कारवाई केली.

या घटनेनंतर घडलेल्या महत्त्वाच्या 10 बाबी –

भाजपच्या निलंबित नेता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारी देशभरात हिंसाचार उसळला. हिंसाचाराच्या उद्रेकामुळे रांचीसह देशातील अनेक शहरांमध्ये संघर्षाचं चित्र समोर आलं.

पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या आंदोलनामुळे 13 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्याचवेळी हिंसाचारानंतर सीएम ममता बॅनर्जी यांनी तेथील उच्चपदस्थ अधिकारी बदलले. हावडा येथील विद्यमान आयुक्त सी. सुधाकर यांची बदली करून त्यांना कोलकातामध्ये ज्वाईंट सीपी बनवण्यात आलं.

यूपीमधील हिंसाचारानंतर सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. हिंसाचार आणि दगडफेकीच्या आरोपींवर कारवाई करत सरकारने एकूण 237 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध 13 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

झारखंडची राजधानी रांची येथे उसळलेल्या हिंसाचारात गोळ्या लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्याचे एसएसपीही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रांचीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कर्फ्यूनंतर प्रशासनाने इंटरनेट बंद करण्याची घोषणा केली.

रांचीमधील 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू आहे. याशिवाय सर्व संभाव्य ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय हिंसाचाराच्या तपासासाठी प्रशासनाने एसआयटीची स्थापना केली आहे.

देशभरात पसरलेल्या उन्मादाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, शुक्रवारच्या नमाजनंतर ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दंगली उसळल्या त्यामागे पाकिस्तानचा हात आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देशातील हिंसाचारासाठी भाजप आणि केंद्र सरकारला गोत्यात आणलं आहे. ओवेसी म्हणाले की, नुपूर शर्माच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी 10 दिवस का लावले? हिंसाचार रोखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं ओवेसी म्हणाले.

उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनशी (AIMIM) संबंधित काही लोकांची नावे समोर आली आहेत. एसएसपी प्रयागराज यांनी सांगितलं की, मास्टरमाइंड जावेद अहमदला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार म्हणाले की, एआयएमआयएमच्या काही लोकांची नावे समोर आली आहेत, आम्ही त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करत आहोत. एसएसपी म्हणाले की, हिंसाचारात 70 नावे आणि 5000 हून अधिक अज्ञात आहेत. त्यांच्यावर गँगस्टर अॕक्ट आणि एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल.

शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर यूपी पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाली. प्रयागराजमधील हिंसा भडकलेल्या भागात दोन बुलडोझर पोहोचले. लोकांकडून घराची कागदपत्रे मागितली जात आहेत. लोकांकडून कागदपत्रांची मागणी करून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.