आज दि.२७ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ईडीचे कारवाईचे अधिकार कायम; सुप्रीम कोर्टाने PMLA कायद्याविरोधातील याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) कायद्याविरोधात करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कारवाईचे अधिकार कायम ठेवले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टात पीएमएलए कायद्याविरोधात करण्यात आलेल्या २०० हून अधिक याचिका एकत्रित करत त्यावर सुनावणी घेण्यात आली. याचिकांमध्ये अटकेचे नियम, कारवाईचे अधिकार, जामीनाच्या अटी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठाने यावर आज निकाल देत ईडीच्या कारवाईच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं.

वीजदर कपात, मराठा, ओबीसी आंदोलनातील गुन्हे मागे; शिंदेंचे एकाच फटक्यात अनेक निर्णय

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून राज्यातील जनता वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याची माहिती दिली आहे. यात शेतकऱ्यांपासून पोलिसांच्या घरकुलापर्यंत अनेक गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यात आले आहे. यात वीजदर कपातीसोबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.राजकिय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे सर्व खटले मागे घेण्यात आले. मराठा समाजाचे आंदोलन, ओबीसी समाजाचे आंदोलन, गणेशोत्सव दहिहंडी यामध्ये देखील कार्येकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! लवकरच मिळणार प्रमोशन

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. सरकार पदोन्नतीच्या संदर्भात गंभीर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यात व्यक्तीगत लक्ष घातलं आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिनिधी मंडळाला सांगितल्याचं पीआयबीनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, ‘सामना’ने त्या जाहिराती नाकारल्या!

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्व पक्षांचे नेते आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार आणि खासदारांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिराती देण्यासाठी संपर्क केला, पण या जाहिराती स्वीकारण्यात आल्या नाहीत, असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदार तसंच शिवसैनिकाला जाहिराती छापता येणार नाहीत, असं वरिष्ठांनी सांगितल्याचं सामनामधल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. माझ्याप्रमाणेच इतर खासदारांनाही जाहिरात छापण्यास नकार दिला गेल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले. आमच्या जाहिराती छापण्यास नकार देण्यात आला असला तरी इकडूनही आमच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळेंनी दिली.

आणखी एका राज्यात Monkeypox चा शिरकाव? 3 संशयित रुग्ण आढळल्याने दहशत

आता कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सही भारतात हातपाय पसरू लागला आहे. केरळ, दिल्लीनंतर आणखी एका राज्यात मंकीपॉक्स घुसल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. उत्तर प्रदेशमध्ये मंंकीपॉक्सचे 3 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

नोएडा आणि गाझियाबादमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणं असलेले तीन संशयित रुग्ण आहेत. नोएडातील रुग्ण ही महिला आहे. जिचं वय 47 वर्षे आहेत.  तिचा चेहरा आणि शरीरावर लक्षणं दिसली आहेत. तिला होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिचे ब्लड आणि स्वॅब सॅम्पल लखनऊला पाठवण्यात आले आहेत. लक्षणं दिसू लागल्यानंतर पतीसह ती जिल्हा रुग्णालयात तापसणी करण्यासाठी आली होती.

गोविंद पानसरे हत्या प्रकरण, ‘सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्याशिवाय आरोप निश्चित नको

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी पार पडली. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच या प्रकरणी कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींपैकी तीन आरोपींना कोर्टात हजर केलं. पण सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती संशयित आरोपींच्या वकिलांनी केली. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या मागणीची दखल घेत पाच ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 ऑगस्टला होणार आहे.

भारतात स्पाईसजेटच्या 50 टक्के विमानांवर 8 आठवड्यांसाठी बंदी

स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पॉट चेक, तपासणी आणि स्पाइसजेटने सादर केलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

“तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे.यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात “तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” अशी घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीमार्फत वारंवार चौकशीला बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या सूडाच्या राजकारणाविरोधात भरणी नाका, सायन कोळीवाडा येथे हे आंदोलन करण्यात आलं.

‘राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील’, शिंदे गटात सामील झालेल्या खासदाराला धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे बरेच खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे याच नाराजीतून शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखाने खासदाराला राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा दिली नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा जिल्हा प्रमुखाने दिला आहे.

संबंधित प्रकरण हे शिर्डीतलं आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ऐनवेळी शिवसेनेने खासदारकीची उमेदवारी दिलेल्या सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतील मतदारांनी दोनदा खासदार बनवलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याची आवई उठवणारे सदाशिव लोखंडे आता मात्र शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

कावड यात्रेवरून असदुद्दीन ओवैसी यांची योगी सरकारवर टीका

कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा दिल्याबद्दल एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव होत असेल, तर अधिकाऱ्यांनी किमान मुस्लीमांच्या घरावर बुलडोजर चालवू नये, असे त्यांनी म्हटले. तसेच एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? असा प्रश्नही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला विचारला आहे.

भारत-विंडीज एकदिवसीय मालिका : निर्भेळ यशाचा भारताचा निर्धार

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी सलग १२ वी एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली. आज बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा निर्धार भारताने केला आहे. भारताने पहिला सामना तीन धावांनी  , तर दुसरा सामना दोन गडी राखून जिंकला आहे. या दोन्ही सामन्यांमधील निसटते विजय हे अखेरच्या षटकांमध्येच साकारलेले आहेत. त्यामुळे विंडीजला या सामन्यांतून धडे घेण्याची गरज आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.