जळगाव : बदलत्या जीवनशैलीने आधुनिक माणसाला लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन देणग्या दिल्या आहेत. लठ्ठपणा आणि मधुमेह यातून बाहेर पडण्यासाठी दोन वेळा जेवण, दररोज नित्य नियमाने केलेला व्यायाम ही सूत्र पाळणे आवश्यक आहे. या सुत्रा मुळे निश्चितपणे लठ्ठपणा आणि मधुमेह दूर होण्यास मदत मिळेल असे आश्वासन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिले.
भारत विकास परिषद देवगिरी प्रांतच्या जळगाव शाखेच्या वतीने संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित केलेल्या बदलती जीवनशैली लठ्ठपणा आणि मधुमेह या व्याख्यानात डॉ. जगन्नाथ दीक्षित बोलत होते.
बरोबरच झालेल्या सभागृहाला संबोधित करताना डॉक्टर दीक्षित यांनी आधुनिक जीवनशैलीतील शरीरावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी माहिती देत आहार आणि व्यायाम यांची सांगड कशी घातली पाहिजे याविषयी अनेक उदाहरणे देऊन महत्त्व पटवून सांगितले.
डॉ. दीक्षित म्हणाले, शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढले की लठ्ठपणा वाढायला लागतो. इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन तयार होणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवा. हा प्रयत्न करत असताना आपल्या खाण्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. असे नियंत्रण मिळवले तर शरीरातील इन्सुलिन तयार होणार नाही. सारखे सारखे शरीरातील इन्सुलिन तयार झाले तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर दिसू लागतो. थोड्या अवधीमध्ये पोटाचा घेर वाढतो आणि माणूस लठ्ठ दिसू लागतो. एकदा का लठ्ठपणा यायला सुरुवात झाली की मधुमेहाची सुरुवात नक्कीच झालेली असते.
या सर्व गोष्टींपासून दूर रहायचे असेल तर आपल्याला आहाराची उत्तम शैली आणि व्यायामाची आवश्यकता आहे असे सांगून डॉ. दीक्षित यांनी त्यांचे प्रसिद्ध सूत्र सांगितले. ते म्हणाले जेव्हा भूक लागेल तेव्हा दोन वेळा जेवण करा. जेवण करतांना गोड पदार्थ आधी खायला हवे. दोन जेवणामध्ये शक्यतो सहा ते आठ तासांचे अंतर असायला हवे. याबरोबर दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करायला हवा. दररोज साडेचार किलोमीटर चालणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने केल्यास निश्चितपणे फायदा जाणवू लागतो. त्यामुळे या गोष्टी आज पासून आपल्या जीवनात आणा आणि त्यावर अंमल करा असा आग्रह त्यांनी यावेळी धरला.
सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी व्याख्यानानंतर डॉक्टर दीक्षित यांना अनेक प्रश्न विचारले. डॉ. दीक्षित यांनीदेखील सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
व्याख्यानाच्या सुरवातीला भारत विकास परिषदेचे अध्यक्ष महेश जडीये यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी भारत विकास परिषदेच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. तुषार तोतला यांनी संपर्क फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. यावेळी कुणाल ललवाणी, डाॕ.राहुल मयूर, संतोष बर्डे, अमर कुकरेजा, दिनेश थोरात, विनीत जोशी ,रत्नाकर गोरे यांचा सत्कार करण्यात आला. आभार सचिव उमेश पाटील यांनी मानले.