किरिट सोमय्या यांच्या घराबाहेर साधारण 100 पोलिसांनी वेढा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमय्या उद्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणी कोल्हापूर येथे जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारकडून दडपशाही सुरू असून मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकारवर ताशेरे ओढले आहे.
किरिट सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर 100 पोलिसांनी वेढा घातला आहे. सोमय्या दहशतवादी आहेत काय? मुंबईत दहशतवादी मोकाट फिरताय. विषारी गॅस, स्फोटाच्या माध्यमातून घातपाताचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून सोमय्या राज्यातील मंत्र्यांचे भ्रष्ट्राचाराचे प्रकरणं बाहेर काढत असताना त्यांची अडवणूक सुरू आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सोमय्या मंत्री मुश्रीफ यांच्या घोटाळाप्रकरणी कोल्हापूर येथे जाणार होते. त्यांनी जाऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. कशाच्या आधारे तुम्ही त्यांना स्थानबद्ध करणार आहात? ही दंडुकेशाही चालणार नाही. सोमय्या यांच्याकडे मुश्रीफांविरोधात पुरेसे पुरावे आहेत. आणखी काही गोष्टींसाठी ते कोल्हापूरला जाणार होते. तुमच्या अडवण्याने घोटाळे बाहेर येण्याचं थांबणार नाही. असा टोलाही पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
बिहार वेगैरे सारख्या राज्यांमध्ये ही दंडुकेलशाही, दडपशाही ऐकायला मिळत होती. महाराष्ट्रातही तुम्हाला हे सुरू करायचंय का? किरिट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष याला घाबरत नाही. असेही पाटील यांनी म्हटले.