राज्यात मागच्या काही दिवसांपासून जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.तर, पुर्वेकडे पावसाने पाठ फिरवली आहे. असे असतानाही ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील 16 गावे व 39 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.
सुमारे 20 हजार 845 नागरिक व 7 हजार 63 जनावरांची तहान 12 टँकरवर अवलंबून आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यातही टँकर सुरू आहेत. सध्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पूर्वेकडे मात्र पावसाने ओढ दिली आहे. ऐन पावसाळ्यात तरी टँकर बंद होतील अशी आशा प्रशासनाला होती. मात्र, पावसाळा सुरू झाला असला तरी बहुतांश ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.